लखनऊ – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्व्हा बील गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्यात घटस्फोट होण्यामागे लॉकडाऊन आणि कोरोनाला दोष देण्याचे काम सध्या सोशल मिडीया मिम्सच्या माध्यमातून होत आहे. अश्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर–प्रदेशात नवरा–बायकोच्या भांडणांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे एका एका आकडेवारीवरून उघडकीस आले आहे.
एरव्ही पती–पत्नीतील भांडणाची १८ ते २० प्रकरणे पुढे येत होती. आता ही संख्या तब्बल ९५ ते १०० पर्यंत पोहोचली आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील सात सदस्यांच्या टीमने हे सर्व्हेक्षण केले आहे. त्यांनी नवरा–बायकोतील भांडणांचे कारणही क्षुल्लक असल्याचे म्हटले आहे. सर्वसामान्य परिस्थितीत ज्या कारणांकडे नवरा–बायको दुर्लक्ष करायचे, आता त्याच कारणांनी वाद–विवाद वाढत आहेत.
घरातील कामांमध्ये हातभार लावणे हे सर्वांत मुख्य कारण असल्याचे या समितीचे म्हणणे आहे. त्यानंतर मुलांना सांभाळणे, जास्तीत जास्त वेळ सोशल मिडीयावर व्यस्त राहणे, खाण्याच्या वस्तूंचे बाहेरून आर्डर मागवणे, दारूचे वाढलेले प्रमाण आदी कारणांचा यात समावेश होत आहे, असे पुढे आले आहे.
गेल्या दोन महिन्यांमधील आकडेवारी सांगते की, उत्तर प्रदेशात नवरा–बायकोमधील सर्वाधिक भांडणे लखनऊमध्ये होत आहेत. राज्यात या कालावधीत एकूण ८०८ प्रकरणे पुढे आली, त्यातील १५ टक्के लखनऊची आहेत. तर १३ टक्के कानपूर, ११ टक्के मेरठ, १० टक्के बरेली, ९ टक्के आग्रा, वाराणसी व गोरखपूर प्रत्येकी ७ टक्के, ५ टक्के प्रयाग व ४ टक्के प्रकरणे मुरादाबादची आहेत. उर्वरित १९ टक्के प्रकरणे उत्तर प्रदेश व इतर शहरांमधील व दुसऱ्या राज्यांमधील आहेत.
ही आहेत मुख्य कारणे
-
घरातील कामांमध्ये हातभार न लावणे
-
मुलांना सांभाळण्यात निष्काळजीपणा
-
सोशल मिडीयावर जास्तीत जास्त वेळ घालवणे
-
मोठ्या प्रमाणात बाहेरचे खाद्यपदार्थ आर्डर करणे
-
दारु पिण्याचे प्रमाण वाढणे