इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुम्ही २७ दशलक्ष एमएएच क्षमतेच्या पॉवरबँकबद्दल कधी ऐकले आहे का? स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे बाजारात पॉवर बँकांची मागणीही वाढली आहे. एक सामान्य वापरकर्ता सहसा ५ हजार एमएएच किंवा १० हजार एमएएच पॉवर बँक खरेदी करतो. पण जर तुम्ही हेवी यूजर असाल तर २० हजार पॉवर बँकदेखील बाजारात उपलब्ध आहेत. पण आता मात्र चीनमधील एका व्यक्तीने चक्क स्वतः २७ मिलियन एमएएचची पॉवर बँक बनवली आहे.
ही व्यक्ती यूट्यूब क्रिएटर हँडी गेंग आहे. त्याने अलीकडेच या पॉवर बँकेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, तो गंमतीने स्पष्ट करतो की तो त्याच्या मित्रांच्या मोठ्या पॉवर बँक पाहून कंटाळला आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे सर्वात मोठी आणि दीर्घकाळ टिकणारी पॉवर बँक असल्याचे त्याला दाखवायचे आहे. पॉवर बँक पाहून असे दिसते की त्या व्यक्तीने एक मोठा बॅटरी पॅक विकत घेतला आहे. त्यानंतर डिझाइन पॉवर बँक सारखे दिसण्यासाठी त्याने सिल्व्हर मेटॅलिकच्या आवरणासह बॅटरी पॅक सुरक्षित केला आहे.
यानंतर पुढचा टप्पा इनपुट आणि आउटपुट चार्जिंग पोर्ट सेट करणे हा असतो. त्यानुसार या व्यक्तीने पॉवरबँकमध्ये १ इनपुट आणि ६० आउटपुट चार्जिंग पोर्ट बसवले आहेत. जे २२० व्होल्टचे आहेत. गेंग याच्या म्हणण्यानुसार त्याने संशोधन केलेली ही पॉवर बँक एकाच वेळी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप यांसारखी वीस उपकरणे चार्ज करू शकते. याव्यतिरिक्त, पॉवर बँकेच्या उच्च २२० व्होल्टेज रेटिंगमुळे, ते टीव्ही, वॉशिंग मशिन आणि इलेक्ट्रिक इंडक्शन कुकर पॉट्स पॉवर करू शकते. असे असले तरी ही पॉवर बँक तिच्या मोठ्या आकारामुळे वापरण्यास शक्य नाही. ती केवळ मनोरंजनासाठी बनवली असल्याचे दिसते.