नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत आणि फ्रान्स सरकारने भारतीय नौदलासाठी २६ राफेल विमाने (२२ एक आसनी आणि ४ दोन आसनी) खरेदी करण्यासाठी आंतर-सरकारी करारावर स्वाक्षरी केली आहे. यात प्रशिक्षण, सिम्युलेटर, संबंधित उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि कामगिरी-आधारित लॉजिस्टिक्स समाविष्ट आहेत. तसेच भारतीय हवाई दलाच्या विद्यमान राफेल ताफ्यासाठी अतिरिक्त उपकरणेदेखील समाविष्ट आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबेस्टियन लेकॉर्नू यांनी या आंतर-सरकारी करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे २८ एप्रिल रोजी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत भारत आणि फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी कराराच्या स्वाक्षरी केलेल्या प्रती, विमान पॅकेज पुरवठा प्रोटोकॉल आणि शस्त्रास्त्रे पॅकेज पुरवठा प्रोटोकॉल दस्तऐवजांचे आदानप्रदान केले.
सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणानुरूप भारतात स्वदेशी शस्त्रांच्या जोडणीसाठीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण या करारात समाविष्ट आहे. राफेल विमानाच्या मुख्य भागासाठी (फ्यूजलेज) सुविधा निर्माण करण्यासोबतच विमानाचे इंजिन, सेन्सर्स आणि शस्त्रास्त्रांच्या देखरेख, दुरुस्ती आणि अतिरिक्त वहन सुविधा यांचाही समावेश आहे. या सुविधांची उभारणी, उत्पादन आणि संचालन यामध्ये एमएसएमईंसाठी महसूल आणि हजारो नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा या करारामुळे निर्माण झाली आहे.
फ्रान्सच्या डसॉल्ट एविएशनद्वारा निर्मित राफेल मरीन (सागरी) एक लढाऊ विमान असून ते सागरी क्षेत्रावर उड्डाणासाठी पूर्णपणे सक्षम आहे. सागरी वातावरणात त्याच्या संचालन क्षमता सिद्ध झाल्या आहेत. या विमानांचे वितरण 2030 पर्यंत पूर्ण होईल. विमानाच्या चालकदलाचे प्रशिक्षण भारत आणि फ्रान्स येथे होईल.
भारतीय हवाई दलाकडून चालवले जाणारे राफेल आणि राफेल मरीन यांच्यात साम्य आहे. या खरेदीमुळे भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल दोन्हींच्या विमानांसाठी लॉजिस्टिक आणि प्रशिक्षण अधिक बळकट होऊन संयुक्त परिचालन क्षमतेतही वाढ होईल. राफेल मरीनमुळे भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, देशाची समुद्रातली हवाई ताकद लक्षणीयरित्या वाढेल.