जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसुतीदरम्यान घडणाऱ्या विविध घटना बरेचदा आश्चर्यचकित करणाऱ्या असतात. कधी दोन तोंड आणि अंग एक असलेली जुळी मुले होतात तर कधी परग्रहावरील जीवांप्रमाणे दिसणारे बाळ जन्माला येते. अशा घटना सातत्याने घडत असतात. अशात मध्य प्रदेशातील झिरन्या येथील रहिवासी असलेल्या महिलेने २६ बोटांच्या बाळाला जन्म दिला आहे. या अनोख्या घटनेने सोशल मीडियावर खळबळ माजविली आहे.
मध्य प्रदेशातील झिरन्या येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला या २० वर्षीय महिलेला शनिवारी मध्यरात्री न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने गरोदर मातेची वैद्यकीय तपासणी केली व परिश्रम घेऊन ज्योती बारेला हिची पहाटे यशस्वी प्रसूती केली. जन्माला आलेल्या या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले कारण या बाळाच्या हातापायाला तब्बल २६ बोटे होती. सामान्यतः आपल्या हातापायाची मिळून २० बोटे असतात. मात्र, या नवजात बाळाला मात्र चक्क २६ बोटे आहेत.
या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटे व दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटे असल्याने सर्वच अचंबित झाले. या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सद्यस्थितीत माता व बालक या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे.
26 Fingers Child Birth Medical History