विशेष प्रतिनिधी, मुंबई
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारे शहीद सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे नाव कोळी किटकाच्या एका नव्या प्रजातीला नाव देण्यात आले आहे. कोळ्याच्या या नव्या प्रजातीचे नाव आयसियस तुकारामी असे ठेवण्यात आले आहे. संशोधकांच्या एका पथकाने एका पत्रात आयसियस तुकारामी असे नाव प्रसिद्ध केल्यानंतर ही माहिती उघड झाली.
महाराष्ट्रात जेनेरा फिनटेला आणि आयसिसय या कोळ्याच्या नव्या दोन प्रजाती सापडल्याची माहिती देण्यासाठी हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशोधक सांगतात, या दोन्हीपैकी एका प्रजातीचे नाव आम्ही २६/११ चे मुंबई हल्ल्यातील हिरो तुकाराम ओंबळे यांच्या नावावर ठेवले आहे. ओंबळे यांना २३ गोळ्या लागल्या होत्या. कुख्यात दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते.








