इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बनावट कंपनी तयार करून २०० कोटींहून अधिक जीएसटी लाटणाऱ्या टोळीचा गुरुवारी सायबर क्राईम पथकाने पर्दाफाश केला. बँक खात्यातून २१५ कोटींचा गैरव्यवहार या प्रकरणात करण्यात आला आहे. यातील आरोपी संजय सिंह यादव हा दिल्लीतील एका सीएचे खाजगी कर्मचारी होता. संजयचा पगार केवळ २५ हजार रुपये होता पण त्याने हेराफेरी करून २५० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय उभा केला. या प्रकारामुळे अटक केलेल्या संजय यादवने सायबर क्राइम टीमसमोर कबुली दिली आहे की, दीड वर्षात ३७ बँक खात्यांमधून २८१ कोटींचा गैरव्यवहार त्याने केला आहे. मात्र, उपलब्ध कागदपत्रांमध्ये २१५ कोटींचीच नोंद असल्याचे खुद्द संजयनेच सांगितले.
हेराफेरी करून संजय यादवने लखनौ ते दिल्ली दरम्यान कोट्यवधींची मालमत्ता निर्माण केली. अटक करण्यात आलेला आरोपी संजय बीएससी केल्यानंतर दिल्लीतील सीए प्रदीप कुमारचा वैयक्तिक कर्मचारी बनला होता. सीए त्याला पगार म्हणून २५ हजार रुपये देत असे. काही दिवसांनंतर सीएने त्याला अनेक कंपन्या उघडण्यास सांगितले.
संजयने पोलिस पथकाला सांगितले की, ६० मुले या घोटाळ्यासाठी काम करत होते. त्यांच्या क्रमांकाचा वापर करून, सीएने अनेक कंपन्यांची GST नोंदणी करून घेतली. त्याचवेळी बनावट कागदपत्रांसह बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. यानंतर या कंपन्यांच्या माध्यमातून करोडोंची करचोरी सुरू झाली.
१८ कंपन्यांची नावे समोर
एसपी सायबर क्राइम त्रिवेणी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात १८ कंपन्यांची नावे समोर आली आहेत. मेरठमध्ये पकडलेल्या ६५० कंपन्यांच्या १७०० कोटींच्या जीएसटी चोरीमध्ये या कंपन्या सहभागी होत्या. आता या तपासाची व्याप्ती वाढवून सर्व कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.
संजयने सायबर क्राईम टीमला सांगितले की, त्याला २१ मार्च २०२० रोजी मेरठमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत टोळीचा मुख्य सूत्रधार सीए प्रदीप कुमार यालाही अटक करण्यात आली. पण नंतर दोघांना जामीन मिळाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा हेराफेरी सुरू केली. ३७ कंपन्यांच्या नावावर जीएसटी नोंदणीसाठी सात मोबाईल क्रमांक वापरले होते, त्यापैकी तीन त्याच्याकडे होते. तर इतर मोबाईल त्याच्या पत्नी व इतर साथीदारांकडे आहेत. संजयच्या म्हणण्यानुसार, सीए प्रदीप कुमारनेच ही फसवणूक केल्याचे सांगितले होते.