लासलगाव (ता. निफाड)
२५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणा-या श्रीरामपूर येथील महिलेला या खंडणीतील ५० हजार रुपयांची रक्कम घेताना येथील लॉजवर रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बुधवारी दुपारी लासलगाव पोलिसांनी या महिलेला अटक केली. या महिलेला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबियांवर बाल विवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने ही मागणी केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अल्केश झुंबरलाल ललवाणी व त्यांचे भाऊ पारस ललवाणी यांचे विरोधात श्रीरामपूर येथील ज्योती चंदुलाल कोठारी या महिलेने जामनेर पोलीस ठाणे येथे बाल विवाह प्रतिबंधक कायदा बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला होता.
या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्हा मागे घेण्यासाठी ज्योती कोठारी महिलेने व तिच्या साथीदारांनी सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी ललवाणी कुटुंबियांकडून मागितली होती. सदर रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी द्यावे असे महिलेने सांगितले होते. या प्रकरणी अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
अल्केश झुंबरलाल ललवाणी यांच्या तक्रारीननंतर बुधवारी दुपारी लासलगावचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकली. त्यात खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज घेताना श्रीरामपुर येथील ज्योती कोठारी या महिलेला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये या महिलेला मदत करणारे प्रफुल लोढा , रा.जामनेर, सुनील कोचर रा.सिल्लोड, जि.औरंगाबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.