नवी दिल्ली – विद्यापीठ म्हणजे उच्च शिक्षणाची सांस्कृतिक मंदिरे होत, असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत मध्य युगीन काळातील नालंदा आणि तक्षशिला या नामांकीत विद्यापीठाची उदाहरणे दिली जातात. आजच्या काळातही काही विद्यापीठे या परंपरेतील मानली जातात. परंतु दुदैवाची गोष्ट म्हणजे काही विद्यापीठे बोगस असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मारक असल्याने या विद्यापीठांवर बनावट असल्याचा शिक्का विद्यापीठ अनुदान आयोगाने मारला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील २४ स्वायत्त (स्वयंभू ) विद्यापीठे बनावट असल्याचे आढळले आहे. तर इतर दोन विद्यापीठे ही काही नियमांचे उल्लंघन करताना आढळले आहेत. विद्यार्थी, पालक, सामान्य जनता आणि इलेक्ट्रॉनिक-प्रिंट माध्यमांद्वारे आलेल्या तक्रारींच्या आधारे, यूजीसीने या स्वयंभू संस्थांना बनावट विद्यापीठे म्हणून घोषित केले आहे.
भारतीय शिक्षण परिषद, लखनऊ, उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट देखील युजीसी कायदा १९५६ चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, या दोघांशी संबंधित बाबी न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच उत्तर प्रदेशात अशा प्रकारच्या बनावट विद्यापीठांची संख्या सर्वाधिक आहे.
यामध्ये वर्नस्य संस्कृत विश्व विद्यालय-वाराणसी, महिला ग्राम विद्यापीठ- अलाहाबाद, गांधी हिंदी विद्यापीठ-अलाहाबाद, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी- कानपूर, नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ- अलीगढ, उत्तर प्रदेश विद्यापीठ- मथुरा, महाराण प्रताप शिक्षण निकेतन विद्यापीठ- प्रतापगढ आणि इंद्रप्रस्थ शिक्षण परिषद- नोएडा यांचा समावेश आहे.
देशाची राजधानी दिल्लीतही अशी सात बनावट विद्यापीठे आहेत. यामध्ये कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर सेंट्रल ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स अँड इंजिनीअरिंग, विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ स्वयंरोजगार आणि आध्यात्मिक विद्यापीठ यांचा समावेश आहे.
ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन अशी विद्यापीठे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागपूर येथे राजा अरेबिक विद्यापीठ हे बनावट आहे. त्याशिवाय कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी येथे प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ असल्याचे आढळून आले आहे. यूजीसीने मान्यता नसलेल्या आणि बनावट विद्यापीठांची यादी प्रसिद्ध केल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.