मुंबई (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – विदेशात उत्पादन केलेल्या सोन्याचा तस्करी करून आणलेला एक मोठा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केला. या साठ्याचे वजन अंदाजे २३.२३ किलो आहे तर त्याची किंमत ११ कोटी ६५ लाखाचे असून या साठ्याची म्यानमारमधून तस्करी केली जात होती. विदेशात निर्मित हा सोन्याचा साठा चंफई- आयझॉल, मिझोराम येथून कोलकाता, पश्चिम बंगाल येथे वाहनात नेऊन/ लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पुरावे विशिष्ट गुप्तचरांनी सादर केले होते. ही तस्करी रोखण्यासाठी २८-२९ सप्टेंबर २०२२ रोजी समन्वित कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सिलीगुडी आणि गुवाहाटीला जोडणाऱ्या महामार्गावर पाळत ठेवली. दोन संशयित वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांची ओळख पटवून त्यांना रोखण्यात आले. दोन दिवसांच्या कालावधीत दोन्ही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर, वाहनाच्या विविध भागात २१ दंडगोलाकार तुकड्यांमध्ये लपवून ठेवलेले २३.२३ किलो सोने जप्त करण्यात आले. तस्करीच्या या प्रकरणात सोने दोन्ही वाहनांच्या मागच्या चाकांच्या मागे असलेल्या चेसीच्या उजव्या आणि डाव्या रेल्सला जोडणाऱ्या क्रॉस-मेम्बर मेटल पाईपच्या आत खास बनवलेल्या पोकळीत आणि सस्पेंशनमधे बसवण्यासाठी सोन्याचा विशिष्ट आकार देण्यात आला होता. जप्त केलेले सोने म्यानमारमधून मिझोराममधील झोखावथार सीमेवरून भारतात आणण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.