अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.
बचावकार्याची ठळक माहिती
अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पूरामधून वाचविण्यात आले.
मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून पूरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.