दिंडोरी – दिंडोरी शहरातील विविध समस्या प्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विधानसभेचे तालिका सभापती आमदार डॉ. सुधीर तांबे यांची भेट घेण्यात आली. यावेळी दिंडोरी शहरातील सातबारा उतारा तक्रारी व इतर समस्या सोडवण्याचे आश्वासन थोरात यांनी शिष्टमंडळाला दिले. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सतिश देशमुख, दिंडोरी नगरपंचायतीचे गटनेते प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते बबनराव जाधव, नितीन धिंदळे, माजी सरपंच शेखर कांबळे, दिपक जाधव, शांताराम घुगे, नितीन गांगुर्डे आदींच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथे भेट घेतली. या भेटीत थोरात यांनी आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी दिंडोरी शहरातील विविध समस्या मांडल्या. दिंडोरी येथे जमिनींचे अकृषक परवाने घेतलेले बजावल्या आहेत. तथापि या व्यावसायिकांनी जमिनीचे परवानगी घेतल्यावेळी शासनाला कर भरलेला आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा कर व दंड आकारणी करु नये,अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सर्व प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी स्वच्छ पारदर्शक प्रशासन देण्याचे आश्वासन दिले. दिंडोरी नगरपंचायतीचे गटनेते प्रमोद देशमुख यांनी शिवाजीनगरसह समस्या मांडल्या. नितीन गांगुर्डे, पोपट चौघुले यांनी गांधीनगर येथील रस्ते दुरुस्तीची व बेरोजगाराची समस्या मांडली. त्याचप्रमाणे गटार काम, पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिश देशमुख यांनी शिवाजी नगर, धनगरवाडा, पेठगल्ली येथील समस्या मांडल्या. विजयनगर येथील सातबारा उतारा दुरुस्ती करुन द्याव्यात. कांदाचाळीचे प्रयोजन बदलून ते घरगुती वापरासाठी करावे कादवा नगर येथील औद्योगिक प्रयोजन रद्द करत निवासी नोंद करावी अशी मागणी युवक नेते नितीन धिंदळे यांनी केली. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही दिंडोरी शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महसूलमंत्री थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते बबनराव जाधव, पोपटराव चौघुले, सचिन आव्हाड, दिपक जाधव, शांताराम फुगे, नितीन धिंदळे, काका देशमुख आदींचा समावेश होता.