अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चक्क शेतजमिनी सरकल्याचे कुणी तुम्हाला सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का. पण, हे खरे आहे. उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये सध्या हे घडले आहे. शेतजमिनी चक्क दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सरकल्याने मोठाच पेच निर्माण झाला आहे. यामुळे आता तब्बल २१ गावांमध्ये सीमावाद सुरू झाला आहे. याला मुख्य कारणीभूत ठरली आहे ती नदी. हो नदीने प्रवाह बदलल्यामुळेच शेतजमिनी दुसऱ्या जिल्ह्याच्या हद्दीत गेल्या आहेत. यामुळे निर्माण झालेला वाद सोडविण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि सरकारपुढे ठाकले आहे.
गोरखपूरमध्ये राप्तीसह अन्य उपनद्यांचा प्रवाह बदलल्याने तब्बल २१ गावांमध्ये सीमा वाद सुरू झाला आहे. नदीची वाहण्याची दिशा बदलल्याने एका गावांच्या जमिनी इतर गावांमध्ये दिसू लागल्या. त्यामुळे या गावांमध्ये गोंधळ सुरू झाला आहे. प्रशासन हे प्रकरण सोडवण्यात गुंतले आहे. नदीकाठावर वसलेल्या गावांमध्ये वेळोवेळी नदीच्या प्रवाहातील बदलामुळे वाद निर्माण होत असतात. ते मिटवण्यासाठी महसूल विभागाचे सर्वेक्षण युनिट, सर्वेक्षणाचे काम करते. परंतु वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हद्दीचा वाद अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येतो. जे मुद्दे मार्गी लावायला अनेक वर्ष लागतात.
नदीचा प्रवाह बदलल्याने सध्या २१ गावांची जमीन दुसऱ्या जिल्ह्यातील गावांकडे गेली आहे. २० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा विवादाबाबत सर्वेक्षण युनिट गोरखपूरच्या सहाय्यक अभिलेख अधिकाऱ्याकडे (एआरओ) प्रलंबित आहे. अशी दोन गावे आहेत ज्यांच्या जमिनीचा प्रश्न तीन जिल्ह्यांच्या सीमा वादात अडकला आहे. वाद मिटत नसल्याचे पाहून प्रशासनाने गोरखपूरचे सर्वेक्षण युनिट वर्षभरात बंद करण्याची तयारी केली आहे. आधीच अधिसूचित ४२ गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना युनिट बंद करण्यास सांगितले आहे.
नद्या वेळोवेळी आपला मार्ग बदलतात. प्रवाहाच्या बदलामुळे एका बाजूची जमीन नदीत विलीन होते आणि दुसऱ्या बाजूची जमीन रिकामी राहते. अशा स्थितीत शेतकऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद निर्माण होतात. विभागामार्फत शेतकऱ्यांच्या संमतीने उपलब्ध जमिनीचे वाटप तहसील पत्र व जागेच्या आधारे सर्वेक्षण केले जाते. हा वाद सहसा जिल्ह्यात होतो, परंतु काहीवेळा नदीचा प्रवाह बदलल्यामुळे एका जिल्ह्यातील जमीन दुसऱ्या जिल्ह्यातील गावात हस्तांतरित केली जाते. तीच पद्धत इथेही पाळली जाते. पण जे शेतकरी समाधानी नाहीत, ते सहाय्यक परिक्षण अधिकारीकडे दावा दाखल करतात. सहाय्यक परिक्षण अधिकारी याबाबत म्हणाले की, बरहलगंज सर्कलमधील मऊ जिल्ह्यातील चक्कीमुसदोही गावाचा जमिनीचा वाद गोरखपूर, मऊ आणि देवरिया यांच्यात अडकला आहे. तसेच रुद्रपूर सर्कलमधील तेलिया अफगाण गावाच्या जमिनीचा हद्दीचा वादही देवरिया, गोरखपूर आणि मढमध्ये अडकला आहे.