नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने एकवीस चारचाकी वाहने दाखल झाली असून त्यात चार इर्टिगा कार व सतरा बोलेरो जीपचा समावेश आहे. आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पाठपुराव्याअंती या वाहनसंख्येत वाढ झाली असून सुमारे सव्वा दोन कोटींची एकवीस वाहने आयुक्तालयाला प्राप्त झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने खरेदी करण्यात आलेली ही वाहने पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ती पोलिस आयुक्तालयाच्या स्वाधिन करण्यात आली.
या वाहनांमुळे घटनास्थळी पोहचणे सहज शक्य होणार आहे. ही वाहने काही पोलिस ठाण्यांसह उपायुक्त, सहायक आयुक्त कार्यालयांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे संशयितांपर्यंत धाव घेण्याचा पोलिसांचा वेग आता वाढणार आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे वारंवार अत्याधुनिक वाहनांची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सतरा वाहने प्रस्तावित केली होती.
शनिवारी (दि.८) दुपारी बारा वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दर्शवून ही वाहने आयुक्तालयाच्या सेवेत दाखल झाली. यावेळी आयुक्त शिंदे यांसह आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्तांसह प्रभारी निरीक्षक उपस्थित होते. माजी उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी पाठपुरावा केल्याने ही वाहने आयुक्तालयात दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे, ही वाहने विविध पथकांसह पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या पोलिस ठाण्यांकडे पुरेशी वाहने नाहीत, त्यांचे बळ वाढण्यास मदत होईल. यासह वाहतूक पथके आणि सहायक आयुक्तांच्या पथकांनाही वाहने पुरवण्यात येणार आहेत.
21 four-wheelers worth two and a half crores have been added to the fleet of Nashik city police force