नाशिक – त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील कर्मचारी महिलेच्या १९ वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१६ डिसेंबर) सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल दिलबाग दुलगज (वय १९ रा.एनसी ९ एमपीए) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव असून त्याची आई अकादमीत सफाई कर्मचारी आहे. एनसी ९ या कर्मचारी वसाहतीतील आपल्या घरात राहूलने अज्ञात कारणातून बुधवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी घराबाहेर जाता येत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. कोवीड १९ च्या लॉकडाउन पासून महाराष्ट्र पोलिस अकादमीत येण्या जाण्यास मज्जाव केला जात आहे. या वसाहतीतील अनेक कुटूंबिय अद्याप घराबाहेर पडली नसल्याचे बोलले जात आहे. अनलॉकनंतर जनजीवन सुरळीत सुरू होऊनही बाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याने अकादमीतील कर्मचारी वैतागले आहेत. यासंदर्भात वरिष्ठांसोबत सातत्याने पाठपुरावा करुनही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे अनेकजण मानसिक तणावात असल्याचा दावा यापूवीर्ही करण्यात आला होता. हा मुद्दा राहुलच्या आत्महत्येनंतर बुधवारी पुन्हा चर्चेत आला. राहुलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. याबाबतची माहिती गंगापूर पोलिस ठाण्यास कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा करुन राहुलचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हारुग्णालयात पाठविला.पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. तसेच अकादमी बाहेर जाण्यास मज्जाव केला जात असल्याचा दावा कुणीही केला नाही. राहुलचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्याने कौटुंबिक कारणातून अथवा प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा आंदाज पोलीसांकडून बांधला जात आहे.