मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोने हा धातू बहुतांश जणांना प्रिय असतो. विशेषतः महिला वर्गाला सोन्याच्या आणि सोन्याच्या दागिन्यांचे विशेष आकर्षण असते. गेल्या वर्षी सोन्याचे भाव साधारण पन्नास हजाराच्या आसपास होते. मात्र आता या वर्षात सोन्याला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. सोने तब्बल 55 हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही दिवसात सोन्याचे दर थोडे कमी झाले असले तरी येत्या काही महिन्यात त्याची हरवलेली चमक परत मिळण्याची अपेक्षा आहे. महामारी आणि महागाईच्या चिंतेमध्ये सुरक्षित गुंतवणूक मानली जाणारी सोन्याची किंमत पुन्हा एकदा 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते.
2020 मध्ये, कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान, सोन्याने खूप वेग घेतला होता. त्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचली होती. पण 2021 हे वर्ष त्यासाठी इतके चांगले वर्ष ठरले नाही. शेअर बाजारातील सततच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचे सोन्याकडे असलेले आकर्षण कमी झाले आहे. या कारणास्तव सोन्याचा भाव सध्या 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. ही किंमत सोन्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सुमारे 14 टक्के कमी आहे. जानेवारी 2021 च्या तुलनेत चार टक्क्यांनी कमी आहे. खरे म्हणजे ही घसरण असूनही, सध्याची सोन्याची पातळीही एकूण आंतरराष्ट्रीय किमतींपेक्षा तीन टक्क्यांनी जास्त आहे, ज्याचे कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेल्या रुपयाला कारणीभूत आहे.
सोन्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे न होण्याचे कारण इक्विटी बाजारातील तेजीला कारणीभूत आहे. तसेच नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या दरम्यान कोविडचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेमुळे युरोपातील अनेक देशांमध्ये निर्बंध लादलेले दिसत आहेत. अमेरिकेनेही आपल्या नागरिकांना प्रवासाबाबत मोठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट मार्केटमध्ये सोने प्रति औंस 1,791 डॉलर्सच्या पातळीवर होते. तर दि. 29 डिसेंबर रोजी भारतातील MCX सोने वायदा 47,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मध्यम कालावधीत सोन्याचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. महागाईच्या चिंतेव्यतिरिक्त, कोरोना, ओमिक्रॉनचे नवीन स्वरूपाचे वातावरण अनिश्चितता देखील वाढीला चालना देऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.