नवी दिल्ली – या वर्षी नोव्हेंबमध्ये बाजारात चलनात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या घटून २२३.२ कोटी नोटांवर आली आहे. म्हणजेच आता एकूण नोटांच्या तुलनेत या नोटा १.७५ टक्के राहिल्या आहेत. ही संख्या मार्च २०१८ मध्ये ३३६.३ कोटी इतकी होती, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली.
राज्यसभेत चर्चेदरम्यान एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी म्हणाले, की केंद्र सरकार विशेष मूल्यवर्ग असलेल्या नोटांच्या छपाईचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून घेत असते. जनतेकडून होणारी पैशांची देवाणघेवाण अधिक सुविधाजनक बनविण्यासाठी मागणी असलेल्या मूल्याच्या नोटांची उपलब्धता करून देण्यासाठी हा निर्णय घेतला जातो.
चौधरी म्हणाले, ३१ मार्च २०१८ रोजी देशात दोन हजार मूल्यवर्गाच्या ३३६.३ कोटी नोटा चलनात होत्या. प्रमाण आणि मूल्याच्या बाबतीत एनआयसीच्या प्रत्येकी ३.२७ टक्के आणि ३७.२६ टक्के आहे. त्याच्या तुलनेत २६ नोव्हेंबर २०२१ रोजी २,२३३ नोटा चलनात होत्या. त्याचे प्रमाण आणि मूल्याच्या संबंधित एनआयसीच्या प्रत्येकी १.७५ टक्के आणि १५.११ टक्के आहे.
कारण काय
चौधरी पुढे म्हणाले, की वर्ष २०१८-१९ पासून नोटांसाठी करेन्सी प्रींटिंग प्रेसला नव्या नोटा छापण्याचे मागणीपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे नोटबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात दिसत आहेत. तसेच काही नोटा खराब होत आहेत किंवा त्या फाटतही आहेत. परिणामी त्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.