पाटणा (बिहार) – कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात पोलिस, वकील आणि न्यायाधीश यांचा नेहमी संबंध येत असतो. संशयित गुन्हेगाराला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांना नेहमीच कोर्टात जावे लागते, परंतु काही वेळा पोलीस खाते आणि न्यायालय यामध्ये विसंवाद किंवा वादही निर्माण होऊ शकतो. परंतु पोलिस आणि न्यायाधीशांनी मध्ये चक्क हाणामारी झाली तर त्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
अशी धक्कादायक घटना झांझारपूर मधील जिल्हा सत्र न्यायालयात घडली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी न्यायाधीशांच्या तक्रारीवरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पाटणा उच्च न्यायालयातही पोहोचले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण न्यायमूर्ती रंजन गुप्ता आणि न्यायमूर्ती मोहित कुमार साहा यांच्या खंडपीठासमोर विशेष सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. मधुबनी जिल्ह्यातील झांझारपूर भागात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर दोन पोलिसांनी हल्ला केला. विशेष म्हणजे न्यायाधीश न्यायालयात सुनावणी करत असताना दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी न्यायाधीशांवर हल्ला केला. या दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
पोलीस अधिक्षक गोपाल प्रसाद आणि घोघरडिहा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिमन्यू कुमार हे दोघेही एका प्रकरणात न्यायालयात हजर होणार होते. त्याचवेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी कोर्टरूममध्ये न्यायाधीशांवर अविनाश कुमार यांच्यावर कथित हल्ला केला, असा आरोप आहे. या दोघांनी न्यायाधीशांना वाचवण्यासाठी आलेल्या वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही जखमी केल्याचा आरोप आहे.
बिहार पोलीस असोसिएशनचे अध्यक्ष मृत्युंजय सिंह म्हणतात की, हायकोर्टच्या तपासानंतरच सत्य बाहेर येईल. पोलीस कर्मचारी दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. मात्र न्यायालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे. सदर न्यायाधीशांचे काय झाले ते कोणी पाहिले नाही, परंतु प्रत्येकाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या जखमा आणि त्यांच्या गणवेशावरील रक्त पाहिले.
यासंदर्भात मधुबनीचे एसपी डॉ. सत्य प्रकाश यांनी सांगितले की, झांझारपूर न्यायालयाचे न्यायाधीश आणि पोलिस कर्मचारी यांच्यात हाणामारी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासानंतर पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल. दुसरीकडे काही वकिलांनीही न्यायालयाचे कामकाज स्थगित केल्याची घोषणा केली आहे. तसेच पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे.