विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संकटाच्या काळात भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एका अश्या टेस्ट किटला परवानगी दिली आहे, ज्याच्या मदतीने लोक घरबसल्या २ मिनीटांमध्ये कोरोना चाचणी करू शकणार आहे.
कोव्हीसेल्फ नावाच्या या किटच्या माध्यमातून अवघ्या १५ मिनीटांत चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. या चाचणीच्या माध्यमातून किमान तुम्हाला कोरोना संक्रमण झाले आहे की नाही, हे स्पष्ट करणार आहे. या किटची किंमत २५० रुपये आहे.
आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की पुढील ३-४ महिन्यांमध्ये हे किट मार्केटमध्ये उपलब्ध होईल. आयसीएमआरने रॅपिड अँटिजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून घरातच नाकातून नमुने घेतले जातील. या किटचा वापर सौम्य लक्षणे असलेल्या किंवा कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना करता येणार आहे. या टेस्टिंग किटला पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्ल या कंपनीने तयार केले आहे.
आयसीएमआरने म्हटले आहे की ज्या लोकांना घरातच कोरोना चाचणी करायची आहे, त्यांनी सर्वांत पहिले गुगल प्ले स्टोअरवरून संबंधित अॅप डाऊनलोड करावे. या अॅपचे नाव मायलॅब कोव्हीसेल्फ असे आहे. त्यानंतर किटवर दिलेल्या माहितीनुसार प्रक्रिया करायची. याच अॅपच्या माध्यमातून पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याची पावती मिळेल. त्याचा फोटो डाऊनलोड करण्याची सोय अॅपवर आहे.
मोबाईल फोनचा डेटा थेट आयसीएमआर कोव्हीड-१९ चाचणी पोर्टलवर स्टोअर होईल. त्यात गोपनियतेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास कुणालाही दुसरी चाचणी करण्याची गरज पडणार नाही. मात्र निगेटीव्ह आलेल्या लोकांना तातडीने आरटीपीसीआर करावी लागणार आहे. अश्याप्रकारच्या किटसाठी आणखी तीन कंपन्यांनी प्रस्ताव दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.