भुवनेश्वर (ओडिसा) – काही वेळा एखाद्या मातेच्या गर्भामध्ये दोष असल्यास अपंग मूल जन्माला येते, तर काही वेळा सयामी जुळे म्हणजेच एकमेकाला चिकटलेली बाळे देखील जन्माला येतात. परंतु अशा घटना खूप दुर्मिळ असतात. अशीच काहीशी किंबहुना यापेक्षाही अनोखी घटना ओडिशा राज्यातील एका दवाखान्यात घडली आहे.
ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने २ डोकी व ३ हात परंतु एक शरीर असलेल्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. केंद्रपारा जिल्हा रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. देबाशिष साहू यांनी सांगितले की, या बाळांचा जन्म ही एक दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे.
एका गरीब कुटुंबातील ही महिला दुसऱ्यांदा माता झाली आहे. जन्म झालेल्या दोन्ही जुळ्या मुली आहेत. त्यांचे प्रमुख अवयव पूर्णपणे विकसित झाले आहेत. नवजात दोन्ही तोंडाने जेवण घेत असून त्यांना दोन नाक आहेत.
जुळ्या बहिणी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांचे शरीर एक आहे. त्यांचे तीन हात व दोन पाय आहेत. ऑपरेशनच्या माध्यमातून या जुळ्या मुलींचा जन्म खासगी रुग्णालयात झाला. त्यानंतर आता त्या बाळांना केंद्रापाराच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे, असे डॉ. साहू यांनी सांगितले.