नाशिक – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्या वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणीचा उल्लेख वगळला आहे. परंतु भारताच्या इतर विद्यापीठात हा विषय अजूनही शिकवला जातो. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या नॅशनल मेडिकल कमिशनने पुढाकार घेऊन हा विषय भारतभरातील अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी डॉ. पवार यांना दिले आहे. या सोबत नॅशनल मेडिकल कमिशन, दिल्ली यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या नऊ वर्षांपासून अंनिस जात पंचायतच्या मनमानी विरोधात काम करत आहे. काही समाजातील कौमार्य चाचणीच्या अनेक घटना उघड केल्या आहेत. काही घटनांत रितसर गुन्हे दाखल केले आहे. कौमार्य चाचणीचा व चारीत्र्याचा काहीही संबंध नसतो. अगदी खेळतांना, सायकल चालवतांनी, व्यायाम करतांना गुप्तांगातील पातळ पडदा फाटू शकतो, असे प्रबोधन अंनिस करत आहे. मात्र अशा कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत आहे.
वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फींगर टेस्ट’चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पिडीत स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासण करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते. परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय आहे. अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नाही. कौमार्यता हा खुपच वैयक्तिक विषय आहे. कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते.
कौमार्य चाचणी ही अवैद्यकीय असल्याचे अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांच्या बोलण्यातून पुढे आले आहे. वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्राध्यापक डाॅ. इंद्रजित खांडेकर यांना अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास दिला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा हा विषय अभ्यासक्रमातून वगळावा यासाठी प्रयत्न केले. याची दखल घेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या नॅशनल मेडिकल कमिशनच्या अभ्यासक्रम व क्रमित पुस्तकातून कौमार्य चाचणीचा विषय वगळावा, अशी विनंती अंनिस कडून करण्यात आली आहे आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणीचा उल्लेख महाराष्ट्रात वगळला तसा राष्ट्रीय पातळीवर वगळावा. त्यासाठी राज्यमंत्री म्हणून प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.