नवी दिल्ली – ‘ग्राहक हा राजा’ म्हटला जातो. त्याचे नुकसान किंवा फसवणूक झाली तर कोणत्याही व्यावसायिकाकडून संबंधित ग्राहकाला त्याबदल्यात नुकसान भरपाई द्यावी लागते, असा राष्ट्रीय ग्राहक कायदा आहे. दिल्लीतील ग्राहक महिलेची हेअर स्टाईल बिघडविल्याने तिला तब्बल २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने हॉटेल सलूनला दिले आहेत. त्यामुळे ही बाब विशेष चर्चेची ठरत आहे.
दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या सलूनमध्ये मॉडेल असलेली आशना रॉय ही महिला तिची हेअरस्टाईल करण्यासाठी दिल्लीतील एका सलूनमध्ये पोहोचली. तिने आपले लांब केस व्यवस्थित करायचे ते सांगितले. मात्र सलूनच्या कर्मचाऱ्यांनी सूचनांचे पालन केले नाही आणि केस चुकीच्या पद्धतीने कापले. याबाबत तिने सलून व्यवस्थापनाकडे तक्रार केली. सलून व्यवस्थापनाने तिच्या केसांवर मोफत उपचार केले. मात्र उपचारादरम्यान, तिच्या डोक्याला पुन्हा खाज येऊ लागली.
हॉटेल सलूनने केवळ महिलेचे केस चुकीचे कापले नाहीत, तर तिच्या केसांना चुकीच्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे महिलेचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्न भंगले. तिने याबद्दल राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली.
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष आर के अग्रवाल आणि सदस्य डॉ. एस.एम. कांतीकर यांच्या खंडपीठाने हॉटेलला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तक्रारदार मॉडेल आशना रॉय यांचे केस खूप लांब असल्याचे ती केसांच्या उत्पादनांच्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत असे. मात्र आता तिची नोकरी गेली आणि तिला मोठे नुकसान सहन करावे लागले कारण तिचे केस तिच्या सूचनांविरूद्ध कापले गेले होते.
केस कापण्यात निष्काळजीपणामुळे व तेथील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे उपचारात त्याचे डोके जळाले आणि महिलेला अजूनही अॅलर्जी आणि खाज येतआहे. तसेच हॉटेलने चूक कबूल केली असून पुन्हा केसांवर मोफत उपचार करून ती चूक झाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने लक्झरी हॉटेल चेनने महिलेला नुकसान भरपाई म्हणून तब्बल २ कोटी रुपये द्यावे, असे आदेश दिले आहेत.