न्यूयॉर्क – कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी अमेरिकेची मॉडर्ना लस आणि प्रोटिन आधारावरील एका लशीचे रिसस मॅकाक या प्रजातीतील माकडाच्या पिल्लांवर सुरुवातीला परीक्षण करण्यात आले. ही लस सुरक्षित असून, कोरोनाविरोधात लढणार्या अँटीबॉडी तयार करणारी सिद्ध झाली आहे. सायन्स इम्युनोलॉजी या नियतकालिकात एक शोधनिंबध प्रसिद्ध झाला आहे. महामारीची भयानकता कमी करण्यासाठी लस हेच मुख्य हत्यार असल्याचे त्यात म्हटले आहे.
अमेरिकेमधील न्यूयॉर्क प्रेस्बाइटेरियन कॉमनस्काई चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या सेली पर्मर सांगतात, कमी वयाच्या मुलांना सुरक्षित आणि प्रभावी लशीमुळे कोविडच्या प्रसाराला अटकाव घालण्यास मदत मिळू शकणार आहे. संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे मुलांवर अनेक नकारात्मक परिणाम झाले आहेत. त्यामुळे मुलांना कोविडपासून वाचविण्यासाठी लसीकरण करणे हाच उपाय आहे.
शोधनिबंधानुसार, रिसस मॅकाक प्रजातीच्या १६ माकडाच्या पिल्लांमध्ये लशीमुळे विषाणूविरोधात लढण्याची क्षमता २२ आठवडे कायम राहिली आहे. संभाव्य सुरक्षा कवच तयार करण्यासाठी संशोधक अनेक दिवसांपासून आव्हानात्मक संशोधन करत आहेत.
अमेरिकेमधील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील प्राध्यापक क्रिस्टिना डी पॅरिस सांगतात, आम्ही संभाव्य अँटीबॉडीचा स्तर वयस्क मॅकाकशी तुलना करून पाहात आहोत. मॅकाकच्या पिल्लांना ३० मायक्रोग्रॅम लशीचा डोस देण्यात आला. तर वयस्क मॅकाकना १०० मायक्रोग्रॅमचा डोस देण्यात आला. दोन्ही लशीनंतर मॅकाक माकडांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत.
डी पॅरिस सांगतात, मॉडर्नाच्या लशीमध्ये आम्ही भक्कम टी पेशींच्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्या संसर्गाची गंभीरता कमी करण्यास महत्त्वाच्या आहेत, हे आम्ही जाणून आहोत. जवळपास दोन महिन्याच्या मॅकाकच्या १६ पिल्लांना आठ- आठच्या दोन समुहात विभागले आणि त्यांचे लशीचा डोस देण्यात आला. चार आठवड्यानंतर त्यांना पुन्हा लस देण्यात आली. प्रत्येक पिल्लाला मॉडर्ना एमआरएनए आधारित लशीचा प्रिक्लिनिक प्रकार देण्यात आला. किंवा अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्सियस डिसिसतर्फे विकसित प्रोटिन आधारित लस देण्यात आली.