जयपूर – कोरोनाचा वाढता कहर पाहता लोकांची सोय व्हावी, यासाठी जयपूरमधील बारमेर जिल्ह्यात युद्धपातळीवर अवघ्या ४८ तासांमध्ये दोन तात्पुरती कोविड सेंटर्स उभारण्यात आली. महसूल मंत्री हरिष चौधरी यांच्या देखरेखीखाली ही सेंटर्स उभारण्यात आली आहेत. कंटेनरमध्ये हे सेंटर उभारले आहे. यामुळे अनेक रुग्णांची सोय होणार आहे.
१०० बेड आणि अत्याधुनिक सुविधांसह पहिले रुग्णालय बायतू येथे उभारण्यात आले आहे. याबरोबरच येथे रुग्णांच्या खाण्यापिण्याची देखील काळजी घेतली जाते. तर बालोतरा उपविभागातील सांभरा के रानी येथे अवघ्या २४ तासांत दुसरे रुग्णालय बांधण्यात आले आहे. या रुग्णालयात २५ बेड्स आहेत. हे रुग्णालय शासकीय महाविद्यालयात उभारण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे.
बायतू येथे ऑक्सिजनचे ३० तर सांभरा येथे २ बेड आहेत. विशेष म्हणजे, यासाठी सरकारकडून एकही पैसा घेण्यात आलेला नाही. उलट आता ही दोन्ही सेंटर्स सरकारच्या स्वाधीन करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. आमदार आणि समाजकार्यात योगदान देणाऱ्यांच्या सहकार्याने ही सेंटर उभारली आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर किती चांगली कामे घडू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.