मुंबई – देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पदांची भरती प्रक्रिया व पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले.
राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू, सिम्बायोसिसच्या प्रमुख संचालक डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असेही श्री. पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. केदार म्हणाले. तसेच या विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले प्रशिक्षक तयार होतील, राज्यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त करत कुलगुरू व प्राध्यापकांची निवड तातडीने करून प्रवेश प्रक्रियेला वेग द्यावा, अशा सूचना मंत्री श्री. केदार यांनी प्रशासनाला दिल्या.
पर्यटनमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, “क्रीडा विद्यापीठाने ‘ऑन फिल्ड’ व ‘ऑफ फिल्ड’वर काम करून प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा, तसेच चांगले प्रशिक्षक तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असे नियोजन करणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या विद्यापीठाच्या माध्यमातून येथे उपलब्ध होईल, या विद्यापीठांतर्गत शालेय स्तरावरील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल.”
खासदार श्री. राऊत म्हणाले, या विद्यापीठाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय विद्यापीठाचे उपकेंद्र राज्यातील विविध विभागांसह देशाची राजधानी दिल्लीतही असावे व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंचा सहभाग अधिक असावा यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. राऊत यांनी केल्या. क्रीडा व युवक कल्याण सेवा आयुक्त श्री. बकोरिया यांनी प्रास्ताविक करून क्रीडा विद्यापीठाबाबत सादरीकरण केले.
दोन अभ्यासक्रम होणार सुरू
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांतर्गत पहिल्या टप्प्यात दोन अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. बी.बी.ए (स्पोर्ट मॅनेजमेंट) व बी.एससी (स्पोर्ट सायन्स) या दोन अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी 60 एवढी विद्यार्थी संख्या असेल.