नवी दिल्ली – उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी हे आता हिंदू धर्म स्वीकारून हरबीर नारायण सिंह त्यागी बनले आहेत. यापुर्वीच मुस्लिम धर्मियांनी त्यांना ठार मारण्याची जाहीर केले होते. त्यानंतरही त्यांच्याबाबत वादांची मालिका सुरूच आहे. रिझवी यांचा शिरच्छेद करण्यासाठी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याने ही बाब आता अतिशय गंभीर बनली आहे.
तेलंगणा काँग्रेस नेते मोहम्मद फिरोज खान यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस देण्याचे वचन देत आहेत. व्हिडिओमध्ये खान म्हणत आहेत की, ‘वसीम रिझवी बद्दल मी चार महिन्यांपासून ऐकतोय. आमची सहनशीलता संपली आहे. त्याचा गळा घोटून माझ्याकडे ये. आणि माझ्याकडून ५० लाख रुपये घे. तसेच जो कोणी त्याला मारेल, त्याचा मी खटला लढेन. या दरम्यान फिरोज रिझवीला शिवीगाळ करतानाही ऐकू येत आहे.
तसेच काँग्रेसचे आणखी एक नेते राशिद खान यांनी रिझवी यांच्या शिरच्छेदासाठी २५ लाखांचे बक्षीस ठेवले आहे. त्यांचाही व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात राशिद खान म्हणतात की, मी २५ लाखांचे बक्षीस देईल. तसेच मी मुस्लिम बांधवांना सांगतोय की, यावर इतका गंभीरपणे विचार करण्याची गरज नाही. कारण अल्लाह तालाने सांगितले आहे की, तो स्वतः मशिदीचे रक्षण करेल, असे खान यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
वसीम रिझवी यांनी दोन दिवसांपूर्वी इस्लाम सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला. रिझवी हे यापूर्वीही इस्लामवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. रिझवी यांना गाझियाबाद मधील दासना मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मात दीक्षा दिली. त्यानंतर मृत्यूनंतर हिंदू रितीरिवाजांनुसार अंतिम संस्कार करण्याची इच्छा रिझवी यांनी व्यक्त केली आहे. तसेच धर्मांतरानंतर रिझवी म्हणाले होते की, दर शुक्रवारी नमाजानंतर मुंडके कापण्याचे फतवे दिले जातात. बक्षीस वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणी आपल्याला मुस्लिम म्हणत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.