इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वास्तविक पाहता विमान अपघात होणे अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण यामधील प्रवास अंधारीत आकाशात असतो, त्यामुळे विमान अपघात झाल्यावर प्रवाशांचे जिव वाचण्याची खूपच कमी शक्यता असते. त्यामुळे विमान चालवणारा पायलटला अत्यंत सतर्क राहून विमान चालावे लागते. तरीही काही वेळा विमानामध्ये बिघाड होऊन अपघात होतातच, अशा अनेक दुर्घटना गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाप्रसंगी झाले आहेत. परंतु काही वेळा टेक ऑफ घेताना किंवा लॉडींग करतानादेखील अपघात होऊ शकतो. दुबई विमानतळावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र ती टळली.
भारतात येणारी दोन विमाने एकमेकांवर आदळण्यापासून बालंबाल बचावली. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत संयुक्त अरब अमिराती एव्हिएशन ऑथॉरिटीकडून अहवाल मागवला आहे. एमिरेट्स बोईंग 777 हे सुमारे 400 आसनक्षमता असलेले विमान रविवार, दि. 9 जानेवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हैदराबादसाठी उड्डाण करणार होते. विमानाने टेक ऑफ रन सुरू केली होते. अचानक विमानात असलेल्या पायलटला टेक ऑफ थांबवण्यास सांगण्यात आले. कारण दुबईहून बेंगळुरूला उड्डाण करणारे दुसरे एमिरेट्स बोईंग 777 विमानाने धावपट्टीला ओलांडले होते.
सदर अपघात वैमानिक किंवा सहवैमानिक आणि विमानातील अन्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला आहे, असे प्राथमिक अहवालानुसार सांगण्यात येते. ही घटना घडली तेव्हा दोन्ही विमानांमध्ये शेकडो प्रवासी होते. विशेष म्हणजे जेव्हा हैदराबाद-आधारित फ्लाइटला टेक-ऑफ रन रद्द करण्यास सांगितले होते, तेव्हा त्याचा वेग ताशी 240 किलोमीटरपेक्षा जास्त होता. तरीही विमान धावपट्टीच्या लांबीच्या जवळपास 790 मीटर खाली सुरक्षितपणे थांबू शकले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
विमानतळाच्या वेळापत्रकानुसार, दोन्ही फ्लाइटच्या सुटण्याच्या वेळेत पाच मिनिटांचे अंतर होते. या घटनेनंतर दोन्ही विमानांनी अखेर भारतासाठी उड्डाण केले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही विमाने त्यांची नोंदणीकृत विमाने आहेत. त्यामुळे, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन नुसार, त्यांची चौकशी केली जाईल. याबाबत त्यांना तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.