हिवरेबाजार (अहमदनगर) – कोरोनाच्या संकटात सर्वात मोठा आघात झाला आहे तो शिक्षणावर. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याचा मार्ग कोरोना संसर्गाने खडतर केला आहे. त्यातच लहान मुलांसाठी अद्याप लसही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे केवळ ऑनलाईन शिक्षणावरच भिस्त आहे. मात्र, हिवरे बाजार गावाने केवळ राज्यच नाही तर संपूर्ण देशात मोठा आदर्श निर्माण केला आहे. कारण, गाव कोरोनामुक्त झाल्याने गावात प्रत्यक्ष शाळा सुरू झाली आहे.
‘गाव करील ते राव काय करील’ अशी एक म्हण मराठीत आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या हिवरे बाजार या आदर्श गावात येत आहे. जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दुसऱ्या लाटेनंतर राज्यात आता कोरोना संसर्ग कमी होत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवाला धोका नको म्हणून राज्यभरात ऑनलाईन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी गेल्या काही महिन्यांपासून गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. सोमवारपासून गावात शाळेची प्रत्यक्ष घंटा वाजण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे सर्व नियम पाळून शालेय वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
यंदा शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यातच हिवरे बाजार ग्रामपंचायतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष शाळेचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यासंदर्भात हिवरे बाजारचे उपसरपंच व राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले की, शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे ग्रामसभेने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधत गावातील शाळा सुरू केली आहे. अनेक पालकांचाच शाळा सुरू करण्याबाबत आग्रह होता. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. आता शाळा सुरू झाली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही शारीरिक त्रास झाला तर त्याच्या आजारपणाचा खर्च गावाच्यावतीने केला जाणार आहे.
घरात कुणी आजारी असेल तर मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. सध्या पाचवी ते सातवीच्या वर्गात १८२, तर आठवी ते दहावीच्या वर्गात ११२ विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची शाळेत शंभर टक्के उपस्थिती आहे.
१०वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा
यंदा दहावीच्या परीक्षा राज्यभरात झाल्या नाहीत. परंतु हिवरे बाजार माध्यमिक विद्यालयाने इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना ११ वीत अडचण येऊ नये यासाठी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा येत्या २५ जूनला होणार असून शिक्षकांना गाव न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियमांचे पालन
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी दररोज विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यानंतर शारीरिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांना बसविले जाते. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शाळेचे वर्ग भरतात. शाळेत जेवणाचे डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळण्यास परवानगी नाही. वर्गात बसायचे व त्यानंतर गावात कोठेही न थांबता थेट घरी जायचे, अशी नियमावली तयार करण्यात आली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!