नवी दिल्ली – सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या नागरिकांच्या खिशाला एक ऑगस्टपासून आणखी झळ बसणार आहे. कर आणि बँकेच्या नियमांमध्ये बदल होत असून, त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे. तसेच केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे आर्थिक विकासाचे लक्ष्य पाहता मुदत ठेवीच्या (एफडी) व्याज दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे महागाईचा दर वाढल्याने सामान्यांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
या अडथळ्यांच्या शर्यतीत एक दिलासादायक गोष्ट म्हणजे आता बँकांची नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस सेवा दररोज सुरू राहणार असल्याने आठवड्याच्या सातही दिवसांत वेतन, निवृत्तीवेतन, बिल भरणा करता येणार आहे. तसेच वीजबिल, गॅस सिलिंडर पुनर्भरण, टेलिफोन, पाणी, कराचे हफ्ते, म्युच्युअल फंड या सर्व सुविधांचे पैसे सातही दिवसांमध्ये भरता येणार आहेत.
कर थकबाकीदारांना दंड
नव्या प्राप्तीकर नियामांनुसार, २०२०-२१ साठी एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कर थकबाकी असलेल्या करदात्यांना दंड भरावा लागणार आहे. प्राप्तीकर अनिधियम-१९६१ च्या कलम २३४ अ अंतर्गत प्रतिमहिना १ टक्का दंड भरावा लागणार आहे. हा दंड ज्येष्ठ नागरिकांना लागू होणार नाही.
बँकसेवा होणार महाग
आयसीआयसीआय बँकेच्या गृहशाखेतून दर महिन्यात एक लाखांहून अधिक आणि एका दिवसात २५ हजारांच्या व्यवहारासाठी प्रति एक हजार रुपयांवर ५ रुपये अतिरिक्त शुल्क किंवा १५० रुपये कमीत कमी शुल्क अदा करावे लागणार आहेत. ग्राहकांना २५ हून अधिक प्रति १० धनादेशांवर २० रुपये अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार आहेत.
तीन आर्थिक व्यवहार मोफत
मुंबई, नवी दिल्लीसह सहा मेट्रो शहरांमध्ये एक महिन्यात तीन आर्थिक आणि गैरआर्थिक व्यवहार मोफत असतील. याहून अधिक प्रत्येक आर्थिक व्यवहारावर २० रुपये शुल्क लागतील. गैरआर्थिक व्यवहारावर ८.५० रुपये शुल्क लागतील. दुसर्या बँकांच्या एटीएममधून रक्कम काढण्यासाठी १५ रुपयांऐवजी १७ रुपये शुल्क लागणार आहेत. गैरआर्थिक व्यवहारांवर ५ ते ६ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
गृहकर्जावर प्रोसेसिंग फिस नाही
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मधून गृहकर्ज घेणार्या ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रोसेसिंग फिस द्यावी लागणार नाही. बँकेने ग्राहकांना मॉन्सून धमाका ऑफर अंतर्गत हा दिलासा दिला आहे. कर्जाच्या ०.४० टक्के फिस बँक घेते.
१५ सीए/१५सीबीसाठी मुदतवाढ
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तीकर विभागाने १५सीए/ १५सीबी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२१ करण्यात आली आहे. परदेशात पैसे पाठविणार्या करदात्यांना दोन्ही अर्ज भरणे आवश्यक आहे.