विशेष प्रतिनिधी, पुणे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज रायगडावरून केली. शिवाजी महाराजांचा ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर परंपरागत पध्दतीनं आणि मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य मराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून हा पहिला मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क असून मराठा समाजाला गृहीत धरू नका असंही यावेळी संभाजी राजे म्हणाले.
शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान, संपूर्ण रायगड आणि किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.