नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले नाशिकचे १७ विद्यार्थी तेथे अडकले असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात या विद्यार्थ्यांच्या पालक व नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केला आहे. आतापर्यंत युक्रेनमधून तीन जण नाशिकला परतले आहे. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्यांमध्ये १६ विद्यार्थी आणि १ नोकरदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मिशन गंगा सुरू केले आहे. एअर इंडिया आणि भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे भारतीयांना परत आणले जात आहे. आता नाशिकचे १७ जण कधी परत येतील याकडे त्यांच्या पालकांसह नातेवाईकांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.