ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. आता ही दुसरी मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या २२ वर गेली आहे.
या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होत असल्यानेच त्यांचा मृत्यू ओढवल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या रुग्णालयात रोज क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. काही वेळा तर एका बेडवर दोन रुग्णांना झोपावे लागत आहे. साथीच्या आजारामुळे ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यातच डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले की, रोज रुग्णालयात ६५०० रुग्ण भरती होत आहेत. शहापूर, पालघर, वाडा, मोखाडा, शहाड येथून या ठिकाणी रुग्ण येत असतात. त्यातच पावसाळी आजारांचेही रुग्ण येत आहेत. रोज रुग्णालयात १२०० ते १३०० बाह्य रुग्ण येत असतात. पण आता दोन हजाराहून अधिक रुग्ण येऊ लागले आहेत. प्रशासनावर ताण पडत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
जे १७ रुग्ण दगावले आहेत. त्यापैकी एक जण शहापूरचा आहे. त्याला सर्प दंश झाला आहे. एकाला रॉकेलचं पॉयझनिंग झालं आहे. एक अनोळखी बाई आहे. तिच्या डोक्याला मार लागला आहे. मागच्या आठवड्यात जे रुग्ण दगावले त्यापैकी एका रुग्णाला फिट येत होती. उलट्या व्हायच्या. हे रुग्ण का दगावतात त्यांची हिस्ट्री तपासा. शेवटच्या क्षणी ते रुग्णालयात उपचाराला येतात. त्यामुळे वेळ निघून गेलेली असती. डॉक्टर प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही, असेही म्हस्के यांनी सांगितले.
17 patients died in a single night