नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कझान येथे १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.
भारत-चीन सीमावर्ती भागात २०२० मध्ये उद्भवलेल्या समस्यांपासून संपूर्ण सुटका आणि निराकरण करण्यासाठी अलीकडील कराराचे स्वागत करताना, पंतप्रधान मोदी यांनी मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळण्याचे आणि शांतता आणि सुव्यवस्था बिघडू न देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था याबाबत देखरेख करण्यासाठी आणि सीमा प्रश्नावर न्याय्य, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह तोडगा शोधण्यासाठी भारत-चीन सीमाप्रश्नावरील विशेष प्रतिनिधी लवकरात लवकर भेटतील याविषयी उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. द्विपक्षीय संबंध स्थिर आणि पुनर्स्थापित करण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या स्तरावरील संबंधित संवाद यंत्रणेचा देखील उपयोग केला जाईल.
दोन शेजारी आणि पृथ्वीवरील दोन सर्वात मोठी राष्ट्रे या नात्याने भारत आणि चीन यांच्यातील स्थिर, अंदाज करण्यायोग्य आणि सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंधांचा प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, अशी पुष्टी दोन्ही नेत्यांनी केली. हे संबंध बहु-ध्रुवीय आशिया आणि बहु-ध्रुवीय जगामध्ये देखील योगदान देतील. धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून द्विपक्षीय संबंधांची प्रगती, धोरणात्मक संवादाला चालना आणि विकासात्मक आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य शोधण्याची गरज नेत्यांनी अधोरेखित केली.