विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात दररोज कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. देशाच्या अनेक भागात लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. परंतु देशातील १५० जिल्हे हे कडक लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहेत. आरोग्य यंत्रणेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण पडत असल्याने ज्या जिल्ह्यात संसर्गाचा दर १५ टक्क्यांहून अधिक आहे त्या जिल्ह्यात कडक लॉकडाउन लावला जावा, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका उच्चस्तरीय बैठकीत हा सल्ला दिला होता. परंतु राज्यांशी चर्चा झाल्यानंतरच केंद्र सरकार यावर निर्णय घेणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रस्तावावर काही बदल अपेक्षित आहेत. परंतु उच्च संसर्ग दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लावून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भर दिला आहे. ज्या जिल्ह्यात संसर्गाचा दर खूप जास्त आहे, तिथे साखळी तोडण्यासाठी काही आठवडे लॉकडाउन लावणे आवश्यक आहे, असे वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यापासून देशात ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत.सोमवारी कोरोनाचे ३.२३ लाख नवे रुग्ण आढळले. मंगळवारी सगळे विक्रम मोडत ही संख्या ३.६२ लाखांवर पोहोचली. मंगळवारी ३ हजार २८५ रुग्णांचा बळी गेला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधून सर्वाधिक रुग्ण आढळले. केरळसारख्या छोट्या राज्यातही सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णसंख्येवरून भारतात सध्या संसर्गाचा दर २० टक्के आहे.
देशात सक्रिय रुग्ण रोज वाढत आहेत. सोमवारी देशात २८.८ लाख सक्रिय रुग्ण होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोनाचे १ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. या सक्रिय रुग्णांमध्ये वरील राज्यांची ६९ टक्के भागिदारी आहे.