मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) – येथील जनपदमधील बघरा येथील योग साधना यशवीर आश्रमात एका मुस्लिम कुटुंबीयातील १५ सदस्यांनी धर्मांतर केले आहे. बागपतच्या बिनौली परिसरात राहणार्या कुटुंबाच्या माहितीनुसार, १८ वर्षांपूर्वी त्यांनी भीतीमुळे मुस्लिम धर्म स्वीकारला होता. आता त्यांना पुन्हा आपल्या धर्मात परतण्याची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
आश्रमाचे संचालक यशवीर महाराज म्हणाले, की हे कुटुंब बिनौली परिसरात राहते. कुटुंबाचे १५ सदस्य सोमवारी आश्रमात आले आणि म्हणाले, त्यांना पुन्हा हिंदू धर्म स्वीकारायचा आहे. त्यानंतर आश्रमात होम-हवन करण्यात आले. बंजारा समाजाच्या या कुटुंबीयांनी हिंदू धर्मावर विश्वास व्यक्त केला. १८ वर्षांपूर्वी ते खूप दहशतीत होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
होम-हवनमध्ये सहभागी झालेल्या कुटुंबात सात महिला, तीन मुली आणि पाच पुरुष होते. आचार्य मृगेंद्र म्हणाले, कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. हे कुटुंब सध्या बिनौली परिसरात मजुरी करत आहे. कुटुंबीयांतील सदस्यांना जानवे परिधान करण्यात आले. यादरम्यान मोहनलाल, सागर शर्मा, सुमित चौधरी, परमजीत, अमरपाल, मुकेश कुमार आणि रवींद्र उपस्थित होते.
ही आहेत त्यांची नवीन नावे
हिंदू धर्मावर विश्वास व्यक्त करणार्या या कुटुंबीयांचे या वेळी नामकरणही करण्यात आले. यामध्ये रहिसूचे नाव यशपाल, जरिनाचे मिथलेश, शमीचे बादल, सनीचे दीपक, गुलबहारचे संगीता, आसमाँचे कविता, आशियाचे वंदना, आनियाचे प्रतिमा, निशाचे निशादेवी, सरोजचे सुलेखा, असगरचे बिल्लू कुमार, शकिलचे अमित, अशरफचे विनोद आणि दानिशचे दिनेश असे नामकरण करण्यात आले. सर्वांनी आपल्या मर्जीने हिंदू धर्मात प्रवेश केला असून त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता, असे मिथलेश यांनी सांगितले.