इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमधील मध्यवर्ती तुरुंगात कैद्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. हत्या करणाऱ्या एकूण 15 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. झारखंडच्या पूर्व सिंगभूम जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तीन वर्षांपूर्वी 2019 मध्ये जमशेदपूरच्या घाघीदिह मध्यवर्ती तुरुंगात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्या हाणामारीत एका कैद्याला प्राण गमवावा लागला होता.
याप्रकरणी मागील दोन वर्षे जिल्हा न्यायालयात हत्येचा खटला चालला. सरकारी पक्षाने सर्व अटक आरोपींविरुध्द ठोस पुरावे सादर केले. त्याआधारे 15 आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने एकाच वेळी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जमशेदपूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र कुमार सिन्हा यांनी हा निकाल दिला आहे. सरकारी पक्षाने सर्व 15 आरोपींचा हत्येच्या आरोपात सहभाग असल्याचे ठोस पुराव्यांनिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पुराव्यांना पुष्टी देणारे साक्षीदार देखील न्यायालयापुढे हजर केले. त्यावर पुरावे खोटे ठरवण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने आरोपींच्या वतीने केला.
तथापि, सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र कुमार सिन्हा यांनी सर्व आरोपींना गुन्हेगारी कारस्थान रचणे अन्वये दोषी ठरवले आणि फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने आरोपींना मोठा दणका न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर इतर सात आरोपींना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कलम अन्वये दोषी ठरवून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सरकारी वकिल राजेंद्र कुमार यांनी न्यायालयाच्या या निकालाची माहिती दिली.
फाशीची शिक्षा झालेले दोघे दोषी सध्या फरार आहेत, असे झारखंडच्या पोलिसांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दोन फरार दोषींविरुद्ध आवश्यक कारवाई सुरू करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. दि. 25 जून 2019 रोजी तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत मनोज कुमार सिंग याच्यासह दोन कैद्यांना गंभीर दुखापत झाली होती. यापैकी सिंहला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परसुडीह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.