खा. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रॅव्हल्स एजंटच्या फसवणुकीमुळे नाशिक येथील मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक, भाविक खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी परतले. खासदार गोडसे यांनी देशाचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि मलेशिया एम्बेशी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.मायदेशी परतलेले भाविक आज खा.गोडसे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले असता त्यांना गहिवरून आले.मी काही वेगळे केलं नाही.तुम्हाला मदत करणे हा माझ्या कर्तव्याचाच एक भाग असून आपण सुखरूपपणे मायदेशी परत आल्याचा मला आनंद झाल्याचे स्पष्ट करून पर्यटकांशी संवाद साधला.
सुभाष ओहळे, मिनाक्षी ओहळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनिल म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृशाली गायकवाड, प्रविण नुमाळे, द्रोपदी जाधव, इंदूबाई रूपवते हे सर्व नागरिक नाशिक येथील असून त्यांनी शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट मार्फत मलेशिया दौऱ्याची आखणी केली होती. वरील पर्यटकांना घेऊन एजंट नाशिक येथून हैदराबादला गेला होता. तेथून एकोणावीस पैकी चार जणांच्या व्हिजाचे काम अपूर्ण असून तुम्ही विमानाने पुढे चला मी सांयकाळी चौघांना घेऊन मलेशियाला येतो असे सांगितले. एजंटने पंधरा पर्यटकांना मलेशियाच्या विमानात बसून दिले. एक दिवस उलटून गेला तरी एजंट मलेशियात पोहचला नाही व त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने पर्यटकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकावले. पोलिसांच्या प्रश्नांना पर्यटकांकडून सुयोग्य असे उत्तर मिळत नसल्याने पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाल्या. पोलिसांनी सर्वांचे पासपोर्ट जप्त करून घेत त्यांना केले क्वॉरंटाइन केले.
पर्यटकांच्या नाशिक येथील नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांर्भिर्य ओळखून खासदार गोडसे यांनी लगेचच देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. खासदार गोडसे यांच्या पत्राची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अॅमबेसीला घटनेची माहिती कळवली. येथील प्रशासनाने लगेचच संबंधित पोलीस स्टेशनची संपर्क साधला. ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे हे पर्यटक अडकले असून त्यांचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना लगेचच परत देऊन त्यांना भारतात पाठवावा असे आदेश दिले. त्यानंतर मलेशिया पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट परत करून त्यांना हैदराबादसाठीच्या विमानात बसवून देत मायदेशी पाठविले. काल सर्व पर्यटक नाशिकला पोहचले. या सर्व पर्यटकांनी आज खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली. यावेळी मलेशियातील अनुभव सांगताना पर्यटकांना गहिवरून आले होते. यापुढे बाहेर देशात जातांना योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना खासदार गोडसे यांनी केल्या.