मुंबई – गेल्या एका वर्षात अनेक समभागांनी शेअर धारकांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकटानंतर भारतीय शेअर बाजारासाठी यंदाचे वर्ष म्हणजे 2021 हे खूप यशस्वी मानले जाते. कारण यंदा मोठ्या संख्येने लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही पेनी स्टॉकचा देखील समावेश असून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे काहीसे धोक्याचे आहे, असे सांगितले जाते. परंतु कंपनीचे तत्त्व आणि व्यवसाय मजबूत असेल तर हे स्टॉक चांगला परतावा देतातच.
2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये केवळ लार्ज, मिड-कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकच नाही तर पेनी स्टॉकचाही समावेश आहे. असाच एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक म्हणजे JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स (JITF Infralogistics). या पेनी स्टॉकने (मूल्याच्या दृष्टीने स्वस्त स्टॉक) गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 3 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
JITF इन्फ्रालोजिस्टिक्सचे शेअर्स 22 नोव्हेंबर 2020 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 6.05 रुपयांच्या पातळीवर होते. 22 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 187.95 रुपयांवर बंद झाले. म्हणजेच 6 रुपयांचा शेअर आता 187 रुपयांच्या पुढे गेला आहे. कंपनीच्या समभागांनी एका वर्षात 3,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 नोव्हेंबर 2020 रोजी JITF इन्फ्रालोजिस्टिक्सच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या त्याचे मूल्य 31.06 लाख रुपये झाले असते.
गेल्या 6 महिन्यांत, JITF इन्फ्रालोजिस्टिक्सचा स्टॉक 11.85 रुपयांवरून 187.95 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत जवळपास 1500 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम 15.86 लाख रुपये झाली असती. म्हणजेच सुमारे 15 लाख रुपयांचा फायदा 6 महिन्यांत झाला असता. तसेच कंपनीच्या समभागांनी यावर्षी आतापर्यंत 1,370 टक्के परतावा दिला आहे.