मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय वस्तू आणि सेवाकर (CGST), मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी वस्तू आणि सेवाकर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी मालाड येथील एका कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. कंपनीने CGST कायदा, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून, वस्तू प्राप्त न करता किंवा पुरवठा न करता 15.23 कोटी रुपये मूल्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवून ते वापरले होते.
केंद्रीय वस्तू आणि सेवाकर मुंबई विभागाच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करून, रसायनांचा व्यापार करणाऱ्या मेसर्स पॅसिफिक फार्मा विरुद्ध तपास सुरू करण्यात आला. सीजीएसटी मुंबई विभागाला या कर चुकवेगिरीत सुमारे 105 कोटी रुपयांची बोगस बिले आढळून आली आहेत.
कंपनीच्या मालकाला CGST कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल CGST कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लानेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. दंडाधिकार्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. . पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई केंद्रीय वस्तू आणि सेवाकर, मुंबई पश्चिम आयुक्तालयाच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क आणि कर चुकवेगिरी करणार्यांवर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, जे प्रामाणिक करदात्यांशी छुपी स्पर्धा करत आहेत आणि सरकारी तिजोरीची फसवणूक करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, गेल्या सहा महिन्यांत CGST, मुंबई पश्चिम आयुक्तालयाने.465.75 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट उघडकीस आणली आहेत, 35.57 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि पाच जणांना अटक केली आहे.
संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी CGST अधिकारी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. विभाग या आर्थिक वर्षात करचोरी करणाऱ्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार आहे.