नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील कोवळ्या तरुणांना प्रशिक्षण देऊन नवे दहशतवादी तयार करण्याचे कुटकारस्थान मोठ्या प्रमाणात चालते. विशेषतः दऱ्या-खोऱ्यांमध्ये अशी अनेक प्रशिक्षण केंद्रे आहेत. तरीही जम्मू-काश्मीरचे पोलीस आणि जवान डोळ्यात तेल ओतून हा प्रकार रोखण्यासाठी काम करीत आहेत. अलीकडेच दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी पाकिस्तानकडे निघालेल्या 14 तरुणांना पोलिसांनी पकडले आणि त्यांची समज घालून कुटुंबाला सोपविले.
हे सर्व तरुण अनंतनाग येथील विविध भागांमधील आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसती तर उद्या हेच तरुण दहशतवादी म्हणून भारतात आले असते आणि त्यांनी हजारोंचा जीव घेतला असता. या तरुणांनी अद्याप सीमा ओलांडलेली नव्हती. पण सीमा ओलांडण्याच्या काही तासांपूर्वीच पोलिसांना ही माहिती मिळाली व त्यांनी रस्त्यातच त्यांना गाठले. बऱ्याच दिवसांपासून या तरुणांचे काऊन्सिलींग सुरू होते. आता मात्र त्यांना कळून चुकले आहे की या मार्गावर मृत्यूच आहे आणि आपल्यानंतर कुटुंबाचा देखभाल करण्यासाठीही कुणी राहणार नाही.
अनंतनाग पोलिसांसाठी हे मोठे यश मानले जात आहे. यापूर्वी कधीच एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी निघालेले नव्हते. 18 ते 22 वर्ष वयोगटातील हे तरुण विविध स्थानिक दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत दररोज संपर्कात होते. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून या तरुणांना आमिष दाखविले होते. त्यामुळेच या तरुणांनी पाकिस्तानात जाण्याचे मन बनविले होते.
आई-वडिलांकडे सोपवले
या तरुणांना पकडून त्यांचे पुन्हा एकदा काऊन्सिलिंग केले आणि त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविले आहे. विशेष म्हणजे यादरम्यान अनंतनागमध्ये एक छोटी बैठक आयोजित करून पोलिसांनी पुन्हा एकदा या मुलांच्या पालकांशी चर्चा केली.