इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही मुले अत्यंत बुद्धिमान असतात, बालपणापासूनच त्यांच्या बुद्धीची चुणूक दिसून येते. अशी मुले सर्वांनाच आवडतात. त्यांचे टॅलेंट पाहून काही मोठी माणसे देखील त्यांच्यावर खुश होतात. अमेरिकेतील एका मुलाच्या बाबतीतही असेच घडले, त्याची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता पाहून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने त्याच्या कंपनीत या मुलाला नोकरी दिली आहे ,सध्या सर्वत्र या मुलाच्या चर्चा सुरू आहे.
सर्वात कमी वयाचा विद्यार्थी
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅरन काझी या केवळ १४ वर्षांच्या मुलाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने नोकरी दिली आहे. विशेष म्हणजे हा मुलगा पुढील आठवड्यात सांता क्लारा युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण करणार आहे. यावरून या मुलाच्या बुध्दी तथा टॅलेन्टचा आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो. येथून कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मिळवणारा हा सर्वात कमी वयाचा मुलगा आहे. यानंतर तो पुढील महिन्यात स्पेस एक्स कंपनीमध्ये आपल्या नोकरीलाही सुरुवात करणार आहे.
९ व्या वर्षी कॉलेजात अन् ११ व्या वर्षी विद्यापीठात
खरे म्हणजे कॅरन हा लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे, असे त्याचे कुटुंबीय सांगतात. तर कॅरन सांगतो की, कुठलीही गोष्ट तत्काळ शिकण्याच्या माझ्या क्षमतेमुळे, माझ्यासाठी मेन स्ट्रीम एजुकेशन योग्य मार्ग नाही, हे तिसऱ्या वर्गात असतानाच शिक्षक, पालक आणि बाल रोग तज्ज्ञांना लक्षात आले. त्याचा IQ फार जलद आहे. त्याच्या अंगी इमोशनल इंटेलीजन्स देखील आहे. ज्यामुळे तो इतर मुलांच्या तुलनेत अधिक परिपक्व आहे. त्याला ९ वर्षांचा असतानाच लॉस पोसीटास कम्युनिटी कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. यानंतर तो ११ वर्षांचा असताना युनिव्हर्सिटीत गेला. कॅरन म्हणतो की त्याला कॅालेजमध्ये शिकताना अत्यंत आनंद वाटला. त्याने इंटेल लॅब्समध्ये इंटर्न म्हणूनही काम केले. कॅरनने आपले बालपन गमावले लोकांचे म्हणणे आहे. याउलट तो, मात्र मिळालेल्या या मोठ्या संधींचे कौतुक करतो. कॅरन त्यच्या आईसोबत एक अपार्टमेन्टमध्ये राहतो. आता जुलै महिन्यात नोकरी सुरू करण्यासाठी तो वॉशिंग्टनला शिफ्ट होण्याची तयारी करत आहे.