विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बारावीच्या परीक्षांच्या तारखा आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे. कारण या संदर्भातील याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल असून त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने मात्र परीक्षेशी संदर्भात आपली तयारी सुरू ठेवली आहे. त्यानुसार २५ जुलैनंतर परीक्षा होईल, असे संकेतही मंत्रालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने परीक्षांसाठी ग्रीन सिग्नल दिला तर आजच तारखा जाहीर होतील, मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता न्यायालयाने मंजुरी दिली नाही तर मग प्रश्नच उद्भवणार नाही. दरम्यान शिक्षण मंत्रालयाने आज अर्थात १ जूनला परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्याचे संकेत दिलेलेच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नजरा न्यायालयापेक्षा शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाकडेच लागल्या आहेत. कारण न्यायालयाने मंजुरी दिल्यास विनाविलंब तारखा जाहीर करण्याची तयारी शिक्षण मंत्रालयाने ठेवली आहे. तशीही देशभरात परीक्षांच्या संदर्भात कमालीची अनिश्चितता आहे. त्यामुळे कुठेतरी स्पष्टता यावी यासाठी शिक्षण मंत्रालय प्रयत्न करीत आहे.
बहुतांश राज्यांना हवी परीक्षा
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन भयभीत वातावरण असले तरीही बहुतांश राज्यांनी केंद्राकडे बारावीची परीक्षा व्हायलाच हवी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्रालय देखील त्याच प्रयत्नात आहे. तारखा जाहीर होण्यापूर्वीच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही, यासाठी विशेष नियोजन केले जात आहे, अशी ग्वाही अनेक राज्यांनी केंद्र सरकारला दिली आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तरी परीक्षा आवश्यक आहे, असा सूर सर्वांच्या निवेदनातून आलेला आहे.