नवी दिल्ली – प्रत्येकाच्या जीवनात मानसिक ताण तणाव असतो. परंतु त्यामुळे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करणे हा पर्याय ठरत नाही. परंतु तरीही आपल्या देशात शेतकऱ्यांपासून ते अगदी कामगारांपर्यंत अनेक क्षेत्रातील आत्महत्यांचे प्रकार घडताना दिसतात. यात विशेष खेदाची बाब म्हणजे दुर्दैवाची बाब म्हणजे विद्यार्थी देखील आत्महत्या करतात. त्यातच उच्चशिक्षित क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
केंद्र सरकारने सोमवारी लोकसभेत सांगितले की 2014 ते 2021 दरम्यान IIT, IIM, केंद्रीय विद्यापीठे, IESC आणि इतर उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये 122 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोकसभेत एकेपी चिनाराज यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी आणखी सांगितले की, 2014 ते 2021 या वर्षात या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये 122 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी 24 विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीचे, 3 अनुसूचित जमातीचे, 41 इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सात वर्षाच्या या कालावधीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये 34 विद्यार्थ्यांनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IEM) मध्ये 5 विद्यार्थ्यांनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IESC) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये 9 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यासोबतच केंद्रीय विद्यापीठांमधील 37 विद्यार्थ्यांनी आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेतील 4 विद्यार्थ्यांनी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
प्रधान यांनी माहिती दिली की, भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे विद्यार्थ्यांची छेडछाड आणि भेदभावाच्या घटना रोखण्यासाठी अनेक पुढाकार घेण्यात आले आहेत. ते म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण) विनियम, 2019 हे विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केले गेले आहेत. या व्यतिरिक्त, मंत्रालयाने शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वाचन, प्रादेशिक भाषांमध्ये तांत्रिक शिक्षण सुरू करणे यासारखी अनेक पावले उचलली आहेत. ते म्हणाले की, भारत सरकारच्या मनोदर्पण या उपक्रमांतर्गत, कोविड महामारीच्या काळात विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या मानसिक आणि भावनिक तंदुरुस्तीसाठी मानसिक आणि भावनिक सहाय्याची विस्तृत श्रेणी सुरू करण्यात आली आहे.