नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तो गाणं गातो, स्टॅण्ड-अप कॉमेडी करतो, कविता करतो, उत्तम वक्ता आहे, अभ्यासातही हुशार आहे… विशेष म्हणजे इतरांना प्रेरणा देण्यासाठी ऑनलाईन सेशन्सही घेतो. वय फक्त १२ वर्षे. कमालीची जिद्द आणि अफलातून इच्छाशक्तीच्या जोरावर विराजने दिव्यंगत्वावर मात करीत इतरांसाठी आदर्श निर्माण केला. विराजच्या या ‘विशेष’ टॅलेंटचं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरींनी कौतुक केलं. विराजने अलीकडेच त्याच्या आई (चैताली) आणि मोठ्या भावासोबत (शंतनू) ना. श्री. गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विराजमध्ये असलेल्या अफलातून क्षमता बघून गडकरींनीही आश्चर्य व्यक्त केलं.
वाशीमच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या विराजच्या वाट्याला जन्मापासूनच संघर्ष आला. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याला काहीतरी दिव्यंगत्व असेल, अशी शंका आईला आली. पण डॉक्टरांनी त्यावर शिक्कामोर्तब केले नव्हते. आईनं जिद्द सोडली नाही. त्यांनी दवाखाने पालथे घातले आणि विराजला स्कोलियोसिस आणि हिप डिसलोकेशन असल्याचे निष्पन्न झाले. पाठीचा कणा वाकलेला असल्याने त्याला सरळ उभं राहण्याचा तर प्रश्न उद्भवणार होताच. शिवाय या त्रासामुळे त्याचे दोन्ही पाय समान नाहीत. त्यामुळे चालतानाही त्रास होणारच होता. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून तर बाराव्या वर्षापर्यंत त्याच्या वेगवेगळ्या तीन शस्त्रक्रिया झाल्यात. आज तो बेल्टच्या आधाराने सरळ उभा राहू शकतो आणि एका पायातील मोठ्या बुटाच्या आधाराने चालूही शकतो. या प्रवासात त्यांचे फॅमिली फिजिशियन आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश चरडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
मात्र, विराजचे दिव्यंगत्व ही त्याची कहाणी नाही. तर या दिव्यंगत्वावर मात करून त्याने निर्माण केलेली स्वतःची ओळख विशेष ठरते. कविता वाचन-लेखन, स्टॅण्ड-अप कॉमेडी, वक्तृत्व, हस्तकला, गायन, जलतरण, बुद्धीबळ आदींमध्ये प्राविण्य सिद्ध करून त्याने अनके राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. रामानुजम मॅथ्स कॉन्टेस्ट, आंतरराष्ट्रीय टॅलेंट सर्च, सायन्स ऑलिम्पियाड यासारख्या प्रतिष्ठीत स्पर्धांमध्ये विराजनं कमावलेलं यश त्याच्यातील टॅलेंट अधोरेखित करणारं ठरलं आहे.
दोन वर्षांपूर्वी विराजने लिहिलेले ‘बियाँड डिसअॅबिलिटी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘नॅशनल लाईल्डलाईन १०९८’बाबत जनजागृती करण्याचा विराजने विडा उचलला आहे. त्यासाठी तो समूपदेशन कार्यक्रम करतो. सार्वजनिक ठिकाणी, शाळांमध्ये किंवा कुटुंबात देखील कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर मुलं स्वतः या चाईल्डलाईनचा वापर करू शकतात, हे तो शाळा-शाळांमध्ये, स्वयंसेवी संस्थांमध्ये जाऊन सांगतो. त्याला चाईल्डलाईनचा ब्रॅण्ड-अॅम्बेसिडर करावे, अशी मागणी त्याच्या आई चैताली यांनी ना. श्री. गडकरी यांच्याकडे केली आहे.
विराजचे लवकरच एक कवितेचे पुस्तकही प्रकाशित होणार आहे. त्याच्या एकूणच संघर्षमय प्रवासाचे आई आणि मोठा भाऊ सहप्रवासी आहेत. विराजच्या प्रत्येक पावलावर त्यांची साथ लाभते. अवघ्या बाराव्या वर्षी त्याने केलेली किमया त्याच्या घरी पुरस्कारांनी सजलेल्या कोपऱ्यावरून लक्षात येते. ना. श्री. गडकरी यांनी विराजला आशीर्वाद देऊन भविष्यात अधिक यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.