जळगाव – शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार व २० माजी आमदार आमच्या सोबत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. यावेळी विधानसभेत गटनेत्याला मान्यता मिळाली आहे. येणा-या काळात संख्याबळानुसार धनुष्यबाण हे चिन्हही आम्हाला मिळेल असा दावाही त्यांनी केला. तब्बल १३ दिवसानंतर गुलाबराव पाटील जळगावमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांना त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पाळधी येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमची शिवसेना खरी असल्याचेही सांगितले. आम्ही उध्दव ठाकरे यांना सोडलं नाही तर त्यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उध्दव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी एेकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. शिवसेना आम्ही वाचवली असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते आमच्या मतावर निवडून आले आहे. त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा नंतर आमच्या विरुध्द बोलावे असेही त्यांनी सांगितले.