मुंबई – दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११वीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. मुंबई महानगरासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या सर्व भागासाठी एकच प्रवेश परिक्षा केंद्रीय पद्धतीने होणार आहे.
विविध शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बाबतची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ व्हावी यासाठी विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या १६ ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल तर १३ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना सरावासाठी संकेतस्थळावर मोफत रजिस्ट्रेशन म्हणजे तात्पुरते प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे, लॉग इन आयडी पासवर्ड तयार करणे, तसेच मिळालेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग एक भरणे, सोबतच शुल्क आणि फॉर्म लॉक करणे, अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्यासाठी शाळा मार्गदर्शक केंद्र निवडणे, आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री करणे, विद्यार्थी प्रवेश अर्ज जातील माहिती भाग एक ऑनलाईन तपासून व्हेरिफाईड करणे आदी बाबी आवश्यक ठरणार आहेत. ११वी प्रवेशासाठी राज्यात २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-१ भरता येईल. सीईटी परीक्षेनंतर मिळालेले गुण, पसंती क्रमांक या गोष्टींसाठी प्रवेशाचा भाग-२ भरावा लागेल. त्याचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
आयसीएससी, सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागला असला तरी अकरावी सीईटी परीक्षेच्या तयारीबाबत आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे हजारो विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहे. आता कोर्टाच्या निर्णयाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. तसेच १२ दिवसात असताना अभ्यास कसा करायचा? असा प्रश्न सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. इयत्ता ११ वी सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतचा तिढा येत्या १० ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयनंतर सुटणार आहे. मात्र, परीक्षा अवघ्या बारा दिवसांवर असताना एसएससी बोर्ड सोडून अन्य विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत अजूनही संभ्रमात आहेत.