नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलीस, अग्निशामक दल, ॲम्बुलन्स यांना आपत्कालीन परिस्थितीत फोन करण्यासाठी ११२ हा नंबर डायल करण्यात येतो. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा असली तरी काही वेळा अग्निशामक दल असो की, पोलीस यांना खोटे फोन कॉल करून त्रास देण्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार घडला आहे. एका महिलेने आपत्कालिन नंबरला फोन करुन पोलिसांना छळल्याने या महिलेला कठोर शिक्षा करण्यात आली आहे.
एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाचा मर्डर झाला आहे, त्वरित पोलीस मदत पाठवा अशी माहिती दिली जात होती व तो फोन बंद होत होता. त्यावर फोन करणाऱ्या महिलेला ६ महिन्याचा कारावास अर्जुनी-मोरगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने सुनावला आहे. त्या महिलेचा वारंवार फोन येत असल्याने अर्जुनी-मोरगावचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन वेळा तपास पथक पाठवले.
खरे म्हणजे परंतु अशी कोणती घटना घडली नसल्याचे व पोलिसांना वारंवार खोटी माहिती देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठाणेदार सोमनाथ कदम यांनी त्या अनोळखी मोबाईल क्रमांकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. न्यायालयाकडून तपासाची परवानगी घेतली. सर्व पुराव्याच्या आधारे आरोपी शिल्पा महेंद्र डोंगरवार ( रा. महागाव ) हिने डायल ११२ या प्रणालीवर कॉल केला होता. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आरोपीला दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर केले. अर्जुनी मोरगाव न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मनोज तोकले यांनी सर्व साक्षीपुराव्यांची पडताळणी करून आरोपी महिलेला ६ महिने कारावास व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.
याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सारिका कातेखाई यांनी काम पाहिले. आरोपीविरुद्ध शिक्षा ठोठावतांना तिच्यावर दया दाखविणे योग्य असणार नाही असे मला वाटते. आरोपीने केलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत गुन्हयाबाबत तिला ६ महीने साधा कारावासाची शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. सदर आरोपी महिलेने डायल ११२ वर १२ ते २१ जुलै या कालावधीमध्ये एकूण ११० वेळा कॉल केल्याचे व खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने तब्बल ११० वेळा पोलिसांना ११२ प्रणालीवर फोन करुन पोलिसांची दिशाभूल करणारी माहीती तिने दिली. पोलिसांना वारंवार शारीरीक व मानसिक त्रास दिला. ११२ प्रणाली ही नागरीकांच्या सोयीसाठी केलेली असतांना त्याचा दुरुपयोग अशा तऱ्हेने करणे हे अत्यंत दुर्देवाची बाब आहे.
110 Times Call on Emergency Dial 112 Police Arrest
Crime Court Legal False Call