जालंधर (पंजाब) – येथील ११ वर्षांचा मेधांश खऱ्या अर्थाने छोटा उस्ताद ठरला आहे. आपल्या अद्भूत प्रतिभेने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेधांशची ख्याती पंजाबपासून बाहेर परदेशातही पोहोचली आहे. तो इतका प्रसिद्ध कसा झाला, असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर ऐका. मेधांशची स्वतःची एक सॉफ्टवेअर विकसित करण्याची कंपनी असून, त्याने आतापर्यंत ५० सॉफ्टवेअर विकसित केले आहेत. तो आपल्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
हुशार मेधांश
सेंट जोसेफ शाळेत इयत्ता सहावीत शिकणारा मेधांश कुमार गुप्ता याने अकराव्या वर्षीच सॉफ्टवेअर विकसक म्हणून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ५० हून अधिक सॉफ्टवेअर बनवून त्याने देश आणि परदेशात आपले नाव उंचावले आहे. एंटर प्रोकोडर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा तो सीईओ आहे. त्याच्यापेक्षा तिप्पट मोठ्या मुलांनाज्ञानाचे ज्ञानही वाटत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेधांशने “मिशन खुशहाल पंजाब” हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे पालक आणि मुले आपल्या आवडत्या आणि चांगल्या नेत्याची निवड करू शकणार आहे.
बाळाचे पाय…
जालंधर येथील डिफेंस कॉलनीत राहणार्या संदीपकुमार गुप्ता आणि मोनिका गुप्ता या दांपत्याच्या पोटी मेधांशचा २०१० मध्ये जन्म झाला आहे. संदीप आणि मोनिका यांची स्वतःची आयटी कंपनी आहे. या कंपनीचे दोघेही संचालक आहेत. मेधांश पाचव्या वर्षापासूनच कॉम्प्युटर कोडिंग करू लागला होता. शाळेत घरी आल्यावर तो आपल्या आई-वडिलांना सॉफ्टवेअर विकसित करताना पाहात असे. कॉम्प्युटरमध्ये वाहनांचे अनेक चित्र किंवा त्यांचे डिझाइन बनविण्याचा प्रयत्न करत होता.
नवव्या वर्षी किमया
ज्या वयात मुले खेळणीशी खेळतात, त्याच वयात मेधांशने मोठे यश मिळविले आहे. नवव्या वर्षी त्याने www.21stjune.com सॉफ्टवेअर बनविले आहे. हे सॉफ्टवेअर त्याने योगदिनी लाँच केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकानंतर एक त्याने अनेक सॉफ्टवेअर विकसित केले. यामध्ये www.coronafreeworld.com, www.missionfateh.com, www.stayalertstaysafe.in, www.sgpcamritsar.org या संकेतस्थळांचे डिझाइन त्याने केले आहे. याच्या प्रचारासाठी एक व्हिडिओसुद्धा बनविला. हे सॉफ्टवेअर प्रसिद्ध आणि प्रचलित असून त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे.
अनेक पुरस्कार
मेधांशचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसारख्या अनेक विक्रमांच्या यादीत त्याचे नाव नोंदविले गेले आहे. त्यानंतर त्याला ईएसीसी युरोपियन आशिया चेंबर ऑफ कॉमर्स कंपनीने बोलावून सन्मानित केले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, विजय सांपला, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, पंजाबचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगला, खासदार अनुराग ठाकूर, बीबी जागीर कौर, जालंधरचे डीसी घनश्याम थोरी यांच्यासह इतर मंत्र्यांनी त्याचा गौरव केला आहे.
समाजकार्य
मेधांश एक मोठा उद्योजक आणि समाजसेवक होऊ इच्छितो. तो असे एक संकेतस्थळ विकसित करू इच्छितो ज्याद्वारे लोकांना मदत होईल. कोणताही खर्च न करता लोकांना सहज माहिती मिळू शकेल असे संकेतस्थळ विकसित करण्याची त्याची इच्छा आहे. मेधांश आपल्या पालकांना रोल मॉडेल मानतो. कोणतेही संकेतस्थळ विकसित करताना त्याचे आई-वडील त्याला मदत करतात, असे तो सांगतो.