मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठी वरील होम मिनिस्टर या लोकप्रिय मालिकेतील महामिनिस्टर या पर्वाचा अंतिम सोहळा आज रंगला. या सोहळ्यात रत्नागिरी येथील लक्ष्मी ढेकणे यांनी तब्बल ११ लाखांची पैठणी जिंकली. त्यामुळेच त्या महाहोम मिनिस्टर बनल्या. तर, नाशिक येथील डॉ. रुपाली पाखले या उपविजेत्या ठरल्या.
अकरा लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये चुरस रंगली होती. महामिनिस्टर महाअंतिम सोहळा आज संध्याकाळी 7 वाजेपासून सुरू झाला. उत्तरोत्तर हा खेळ रंगत गेला. सर्वांचे लाडके आदेश भाऊजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात हा शो पोहोचविला आहे. अगदी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक शहरातच नव्हे तर त्यांनी अनेक छोट्या शहरातील कॉलनी मध्ये महिलांबरोबर म्हणजेच आपल्या वहिनीसमवेत हा शो मधील खेळ खेळून रंगत आणली. संपूर्ण राज्यात महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अठरा वर्षाहूनही जास्त काळ महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे.
या शो मध्ये अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखले, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात एक लाखाच्या पैठणीचा मान मिळवला. या दहा जणींमध्ये महाअंतिम सोहळा रंगला. या पर्वाच्या सुरुवातीपासून अकरा लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी आहे.
गेली 18 वर्षे सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज 1 पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत ना,ही त्यामुळे हे ट्रोलिंग होते. तसेच 11 लाखांची पैठणी ही येवले शहरामध्ये बनते आणि ही पैठणी बनवणारे कारागीर मूकबधीर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतो. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होते. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
11 lakh paithani mahaminister tv show zee marathi final ratnagiri lakshmi dhekne winner