सूर्यम् शरणं गच्छामि!
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा निर्यात करणारा ऑस्ट्रेलिया सूर्याच्या उपासनेतून जगासमोरच आदर्श निर्माण करीत आहे. म्हणूनच छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत ऑस्ट्रेलिया जगाचे नेतृत्व करु शकत आहे. पण, हे सहजासहजी घडलेले नाही. त्यामागे सर्वंकष धोरण आणि धडपड आहे.
जगातील बहुतांश देशांना कोळशाची निर्यात करणारा देश ऐकाऐकी सौर ऊर्जेची निर्मिती करु लागला तर. असा प्रश्नही कुणाला पडणार नाही आणि पडला तरी त्याचे उत्तर समाधानकारक मिळणार नाही. पण, ऑस्ट्रेलियाने ते खरे करुन दाखविले आहे. सरकार, प्रशासन आणि नागरिक यांनी ठरविले तर ते काय करु शकतात याचा वास्तुपाठ सध्या संपूर्ण जगालाच मिळत आहे. चारपैकी तब्बल एका घरावर सध्या सौर ऊर्जा निर्मिती करणारे पॅनल्स बसविण्यात आले आहेत. हे प्रमाणच असेच वाढत राहिले तर ऑस्ट्रेलिया लवकरच कॅलिफॉर्निया, जपान आणि जर्मनी यांना मागे टाकणार आहे. ऑस्ट्रेलियात सूर्योपासनेची ही चळवळ नक्की कशी निर्माण झाली ते जाणून घेणे आवश्यक आहे.
कोळशाच्या ज्वलनातून निर्माण होणारी ऊर्जा (वीज) ही प्रदूषणकारी आहे. कारण, कोळसा जेव्हा जाळला जातो तेव्हा हवेत कार्बन डाय ऑक्साईडचे प्रचंड प्रदूशण होते. आणि हाच कार्बन जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. ओघाने हवामानातील बदल आलेच. त्यातच ऑस्ट्रेलिया हा सर्व बाजूने समुद्राने वेढलेला देश. जागतिक तपमान वाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याची भीती आहे. ती जर खरी ठरली तर निम्मा ऑस्ट्रेलियाच संकटात सापडणार आहे. कारण, समुद्र किनाऱ्यांलगतच मोठी शहरे वसली आहेत. तिच विकास आणि अर्थकारणाची मोठी केंद्रे आहेत. इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा आपण आपल्या कृतीतूनच दाखवून देऊ असा चंग ऑस्ट्रेलियाने बांधला आहे. विशेष म्हणजे हा केवळ दिखावा नाही तर जे काय करायचे ते सर्वंकष आणि संपूर्ण जगालाच आदर्श ठरेल असे.
सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने अभ्यास केला की आपल्यालाच आपले प्रदूषण कमी करायचे तर सर्वाधिक प्रदूषणकारी काय आहे ते कसे रोखता येईल. कोळशाचे ज्वलन हे त्यापैकीच एक. मुबलक सूर्य प्रकाश मिळतो मग त्याचाच विचार त्यांनी केला. सूर्य प्रकाशापासून ऊर्जा बनवायची तर त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान हवे. आणि हे तंत्रज्ञान वापरणारे नागरिक म्हणजे लोकचळवळ आली. यासाठी ऑस्ट्रिलयन सरकारने सर्वंकष असे धोरण तयार केले. सौर ऊर्जेसाठी लागणारे पॅनल्स, बॅटरी, त्यासाठीचे कुशल मनुष्यबळ अशा बारीक सारीक बाबींचा त्यासाठी विचार करण्यात आला. लोकसहभाग कसा वाढेल, त्यासाठी काय करायला हवे, जनजागृती, नागरिकांचा कसा आणि किती फायदा होईल, यासह बहुविध बाबींचा अभ्यास करण्यात आला. यातूनच मग सौर मिशन साकारले गेले. क्षणाचाही विलंब न लावता सुरू झाले हे मिशन.
हवामानातील बदलांना तोंड द्यायचे तर आपण प्रत्येकानेच कृती करायला हवी, अशा प्रचारची विचारधारा ऑस्ट्रेलियन नागरिकांमध्ये बळावली. यातूनच सूर्याची पुजा सुरू झाली. वाढते वीजेचे दर आणि सौर पॅनल्सचे किफायतशीर दर ही बाब सुद्धा नागरिकांना उद्युक्त करणारी ठरली. शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये अशा सर्वच ठिकाणी सौर पॅनल्स बसू लागले. यातून विजेची निर्मितीही सुरू झाली. ही वीज निर्माण होणे केवळ अभिप्रेत नव्हते तर सरकारने ही वीज मुख्य ग्रीडलाही जोडण्याचे चपखल नियोजन केले. यातूनच औष्णिक विद्युत केंद्रांवरील भार हळूहळू घटला. क्वीन्सलँड आणि साऊथवेल्स या दोन राज्यांनी तर मोठीच मजल मारली. येथील निम्मी घरे सध्ये सौर ऊर्जेने प्रकाशमान झालेली आहेत.
सौर ऊर्जेतून आपण पैशांची बचत करु शकतो हा सर्वात मोठा संदेश आहे. आणि तोच नागरिकांना पटल्याने त्यांनी हे अतिशय मनावर घेतले. केंद्र सरकारसह त्या त्या राज्य सरकारांनी वेगवेगळे इन्सेन्टिव्ह देऊ केल्यानेही नागरिक त्याकडे आकृष्ट झाले. त्यातही या साऱ्या तंत्रज्ञानाचा दर्जा उत्तम राखणे आवश्यक होते. कारण, तसे झाले नाही तर अपयश पदरी पडल्यानंतर त्याचा मोठा परिणाम होणार होता. जसे जसे छतावरील सौर पॅनल्स यशस्वी होत गेले तसे तसे आणखी लोकसहभाग वाढत गेला. जिथे केवळ १ टक्के सौर ऊर्जेची निर्मिती होत होती ती थेट ५ टक्क्यांवर गेली. केवळ वीज निर्मितीच नाही तर वाहनांना लागणारी ऊर्जा, मनोरंजन किंवा करमणुकीचे साहित्य सौर विजेवर चालेल अशी व्यवस्था नागरिक आता घरोघरी करीत आहेत. बांधकामांची परवानगी देतानाही सौर ऊर्जेचा विचार केला जाऊ लागला. पाहता पाहता वीज ग्राहकच वीज उत्पादकही बनले आहेत. आगामी १५ वर्षात ऑस्ट्रेलियातील तब्बल दोन डझन औष्णिक विद्युत प्रकल्प निवृत्त होणार आहेत. ते लक्षात घेऊनच ऑस्ट्रेलियाने सौर मार्ग निश्चित केला आणि त्यादृष्टीने आ वाटचाल सुरू झाली आहे.
दर्जेदार बॅटरी, सौर पॅनल्स, त्याला लागणारे सर्व सुटे भाग आणि या सर्वाची जोडणी करणारे कुशल कारागिर या सर्वांची उपलब्धता तर दुसरीकडे नागरिकांना सौर पॅनल्स मधून मिळणारा रिझल्ट याद्वारे ऑस्ट्रेलियातील चारपैकी एका घरावर आता सौर वीज निर्माण होत आहे. एका वर्षातच सौर ऊर्जेसाठी लागणाऱ्या तब्बल ७० हजार बॅटरी विकल्या गेल्या. आणखी २८ हजार बॅटरींची ऑर्डर नोंदविण्यात आली आहे. यातूनच तेथील सौर चळवळीचा अंदाज आपल्याला येतो. छतांवरील सौर पॅनल्स हे दिमाखाने ऊर्जेची निर्मिती करीत असून त्याद्वारे ऊर्जा स्वयंपूर्णतेची अनोखी वाटचालही यशस्वी होताना दिसत आहे.
आपण एक ध्येय निश्चित केले तर त्या दिशेने जाता येते आणि ते पूर्णही करता येते याचा वास्तुपाठ ऑस्ट्रेलियाने जगभरातील देशांसमोर ठेवला आहे. केवळ सरकार किंवा नागरिक नाही तर सर्वांनी मिळूनच प्रयत्न केले तर यश येतेच हे सुद्धा सिद्ध होत आहे. तसेच, एखादी बाब निश्चित करताना त्याचा किती बारीकसारीक आणि सर्वंकष विचार करण्यात आला त्यासाठी योग्य धोरण आणि विविध बाबींची अंमलबजावणी, लोकसहभाग या साऱ्यातूनच मैलाचा दगड प्रस्थापित होऊ शकतो हे सुद्धा स्पष्ट होत आहे. पर्यावरणीय संकटांकडे आशादायी नजरेने बघण्याची दृष्टीही ऑस्ट्रेलियाने दिली आहे. भारतासह अनेक देशांनी त्याचे अनुकरण करणे ही सध्याच्या काळाची नितांत गरज आहे. ऑस्ट्रेलियातील हे यश देशोदेशी नजिकच्या काळात दिसून येईल, अशी खात्री बाळगायला हरकत नाही.