विशेष प्रतिनिधी, मुंबई
केवळ राज्याचाच नव्हे तर देशाचा विचार केला तर कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई शहराला बसला आहे. तरीही त्यात एक सुखद घटना म्हणजे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत १००१ कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसुती केली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
नायर रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र, नवजात आणि बालरोगशास्त्र आणि अॅनेस्थेसिओलॉजी या विभागाने यासाठी अथक परिश्रम केले, असे बीएमसीने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. या कौतुकास्पद कामगिरी बद्दल राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्यासह कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले आहे.
एप्रिल मध्ये नायर रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले होतं. तर मागील वर्षी १४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रसुती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत १ हजार कोरोनाबाधित मातांनी १०२२ बालकांना जन्म दिला आहे. यामध्ये १ तिळे आणि १९ जुळ्यांचा समावेश आहे.
गेल्या एक वर्षात रुग्णालयात प्रसुती विभागातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र न थकता यासाठी कार्य केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग जन्मजात होत नाही. तसेच माता जरी कोरोनाबाधित असली तर पोटातील बाळाला संसर्ग होत नाही. परंतु जन्मानंतर आई आणि बाळाचा संपर्क आल्यानंतर संसर्ग होऊ शकतो, असे नायर रुग्णालयातील डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितले.
तसेच नियमानुसार,आई कोरोनाबाधित असेल तर जन्माला आलेल्या बाळाची कोविड-१९ चाचणी करणे बंधनकारक आहे. मागील एक वर्षात अनेक बालके कोरोनाबाधित आढळली, परंतु त्यांच्या कोणतीही तीव्र लक्षणे नव्हती. या बालकांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.